

राजेंद्र जाधव
अकोले: पावसाळा सुरू होताच अकोले तालुक्यात सर्पदंशाच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले आहे. तर पावसाळा सुरू होण्यापूर्वीच मे, जून, जुलै या महिन्यातील ८० दिवसांत ग्रामीण रुग्णालये व बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खाजगी दवाखान्यात तब्बल १३१ सर्पदंशाच्या रुग्णावर उपचार करण्यात आले आहेत.
दरम्यान, अकोल्यात सर्वाधिक खाजगी दवाखान्यात ६७ सर्पदंश झालेल्या रुग्णांनावर उपचार करण्यात आले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच मे, जून, जुलै या तीन महिन्यांत १३१ जणांना सर्पदंश झाल्याची नोंद आहे. परंतु आदिवासी भागात सर्पदंशाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागात काही परिसराला शहरीकरणाचा वेग, जंगल आणि झुडपांचे कमी होत जाणारे क्षेत्र, तसेच सापांच्या नैसर्गिक भक्ष्याची कमतरता यामुळे सापांचा वावर मानवी वस्त्यांकडे वाढत आहे. आणि पावसाळ्यात बिळांमध्ये पाणी साचल्याने साप सुरक्षित आसरा आणि भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतात.
परिणामी, जून ते ऑक्टोबर या कालावधीत सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे डॉक्टर सांगतात.
तसेच पावसाळा सुरू होताच शेतात, ग्रामीण भागात, तसेच घराच्या आजूबाजूला सापांचा वावर वाढतो. परिणामी, पावसाळ्याच्या दिवसांत सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे चित्र आदिवासी भागात आहे.
या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यात अधिक काळजी घेऊन नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे, अकोले तालुक्यात राजूर, कोतुळ, समशेरपूर, अकोले ग्रामीण रुग्णालयात व शेंडी, मवेशी, विठा, म्हाळादेवी, खिरविरे, लाडगाव, कोहणे, धामणगाव पाठ (कोतुळ) प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील अँटी-स्नेक व्हेनम (एएसव्ही) लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
अकोले तालुक्यातील जि. प. च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात २५, राजूर ग्रामीण रुग्णालयात १९ रुग्ण, समशेरपुर ग्रामीण रुग्णालयात ४ रुग्ण, कोतुळ ग्रामीण रुग्णालयात १६ रुग्ण, अकोले ग्रामीण रुग्णालयात ८ आणि खाजगी रुग्णालयात ६७, अशा एकुण १३१ सर्पदंश रुग्ण उपचारासाठी दाखल केल्याची नोंद झाली आहे. तसेच शेडी, विठा, मवेशी, लाडगाव आदी प्राथमिक आरोग्य केंद्रातील २५ रुग्णांना सर्पदंश झाल्याची नोंद संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली आहे.
काय करावे, काय टाळावे?
सर्पदंशाच्या रुग्णाला धीर द्या, कारण घाबरल्याने रक्ताभिसरण वाढून विष वेगाने पसरते. दंश झालेला भाग जास्त हलवू नका. रुग्णाला स्थिर ठेवा. रुग्णालयात नेईपर्यंत दंश झालेल्या भागाच्या थोडेवर कापडी पट्टी सैलसर बांधा. तसेच दंश झालेल्या जागी ब्लेडने काप मारू नका किंवा रक्त बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका. जखमेवर कोणतेही घरगुती तेल, तिखट किंवा जडीबुटी लावू नका. पट्टी एवढी घट्ट बांधू नका की रक्तप्रवाह पूर्णपणे थांबेल, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
मांत्रिक नव्हे, डॉक्टर गाठा
आजही ग्रामीण भागात सर्पदंश झाल्यास मांत्रिक किंवा जडीबुटीच्या चक्रात पडून वेळ वाया घालवला जातो, जो जीवावर बेतू शकतो. सापाचे विष शरीरात पसरू नये म्हणून केवळ वैद्यकीय उपचार हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता रुग्णाला तत्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करा.