

श्रीरामपूरः श्रीरामपूर नगर पालिका व पाटबंधारे विभागाने एकत्रित अतिक्रमण मोहीम राबवून काल पालिकेने शहरातील सोनार गल्लीत, तर पाटबंधारेने नॉर्दन ब्रँचवरील पूनम हॉटेलमागील भागात थेट अतिक्रमण मोहीम राबविली. वराह पैदास केंद्रासह सोनार गल्लीतील अतिक्रमण जमीनदोस्त केले आहे. (Latest Ahilyanagar News)
उपविभागीय पाटबंधारे व पालिकेची कालव्यालगतच्या अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई काही दिवसांपासून सुरुच आहे. दिऊरा हॉटेलपासून संगमनेर रस्त्यावरील नॉर्दन ब्रँचपर्यंत अतिकमण दोन दिवसांपूर्वी हटविले होते. पुन्हा नॉर्दन ब्रँचवरील पूनम हॉटेलमागील भागात कारवाई सुरु करीत बेकायदेशीर वराह पैदास केंद्र जमीनदोस्त करण्यात आले. सोनार गल्लीतील दुकानाचे अतिक्रमणबाबतचा वाद न्यायालयात प्रलंबीत होता. काही दुकानदारांनी दुकाने खरेदी केली होती. खरेदी खत असताना, दुकाने अतिक्रमित कशी, असा वाद न्यायालयात सुरु होता, मात्र निकाल दुकानदारांविरोधात लागल्यामुळे काल पालिकेने अतिक्रमण मोहीम हाती घेवून, सोनार गल्लीतील दुकाने भुईसपाट केली. दुकानदारांनी या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करीत, आमच्या रोजीरोटीचे काय, असा सवाल उपस्थित केला.
दरम्यान, पाटबंधारे विभागाने अतिक्रमण हटावो मोहीम सुरुच ठेवली आहे. काहींनी स्वतः अतिक्रमणे काढली, तर पक्के घरे व दुकानदारांना मुदत देण्यात आली आहे.
कालव्यालगतच्या बेकायदेशीर शेडला आता थारा नाही. पाण्याचा प्रवाह कायम ठेवण्यासह स्वच्छता राखण्यासाठी अशा अतिक्रमणांविरुद्ध कडक कारवाई सुरूच राहील, असा इशारा पालिका व पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी दिला आहे.