Political News
बापू निष्ठेने लढले, दादांशी भिडले!

Political News: बापू निष्ठेने लढले, दादांशी भिडले!

आघाडी धर्माचे असेही पालन!
Published on

संदीप रोडे

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता त्या काळात बाबूराव भारस्कर यांनी दोनदा काँग्रेसकडून आणि दोनदा अपक्ष म्हणून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. पुनर्रचनेत 1972 मध्ये श्रीगोंद्याचे आरक्षण संपले आणि तो खुला झाला. त्या वेळी काँग्रेसने प्रभाकर शिंदे यांना उमेदवारी दिल्याने भारस्कर त्यांच्या विरोधात अपक्ष लढले अन् विजयी झाले.

1978मध्ये शिवाजीबापू नागवडे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. जनता पार्टीचे मोहनराव गाडे त्यांच्या विरोधात होते. मात्र गाडेंचा 13 हजार मतांनी पराभव करत श्रीगोंद्याचा भूमिपुत्र आमदार झाला. 1980च्या निवडणुकीत जनता पार्टीने उमेदवार बदलत बबनराव पाचपुते यांना संधी दिली. शिवाजीबापू विद्यमान आमदार असल्याने काँग्रेसचे उमेदवार तेच होते. ‘अर्स’ काँग्रेसकडून कुंडलिक जगताप हेही त्या वेळी मैदानात होते.

या निवडणुकीत काँग्रेसची मतविभागणी झाली आणि बबनराव पाचपुते यांचा श्रीगोंद्याच्या पटलावर उदय झाला. 1999 आणि 2014चा अपवाद सोडला, तर बबनराव पाचपुते सतत आमदार राहिले, तेही वेगवेगळ्या चिन्हावर!

जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष, भाजप असा बबनराव पाचपुते यांचा राजकीय प्रवास राहिल्याचे दिसते. 1985मध्ये जनता पक्षाचे उमेदवार बबनराव पाचपुते आणि काँग्रेसचे शिवाजीबापू यांची लढत झाली. मात्र या लढतीत पाचपुते जिंकले. 1990ला पाचपुते हे जनता दलाकडून लढले. बापू काँग्रेसचेच उमेदवार होते. पण याही निवडणुकीत अवघ्या 818 मतांनी बापूंना पराभव पत्करावा लागला. सलग तीन वेळा आमदार राहिलेले पाचपुते यांचा पुढे काँग्रेस पक्षात प्रवेश झाला अन् सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात ते गृह राज्यमंत्री झाले. श्रीगोंद्याला पहिल्यांदाच लाल दिवा मिळाला.

पुढच्या 1995च्या विधानसभेला बबनदादा काँग्रेसकडून उमेदवार झाले. या निवडणुकीत भाजपकडून घनश्याम शेलार आणि बाबासाहेब सहादू भोस हे अपक्ष म्हणून पाचपुतेंच्या विरोधात लढले. त्या वेळी शिवाजीबापू निष्ठा सांभाळतानाच राजकीय विरोधक पाचपुते यांच्यापासून काहीसे दूरच राहिले. भोस, शेलार यांची मतविभागणी पाचपुते यांच्या पथ्यावर पडली अन् ते सलग चौथ्यांदा आमदार झाले.

1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर बबनराव पाचपुते त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे शिवाजीबापूंना काँग्रेसने पुन्हा संधी दिली. भाजपकडून अ‍ॅड. कैलास शंकर शेवाळेही मैदानात होते. मतविभागणीचे कायमच लाभार्थी असलेले पाचपुते यांना आस्मान दाखवत या निवडणुकीत बापूंनी विजय मिळविला आणि पाचपुते यांच्या सलग विजयाला ब्रेक मिळाला. 1978नंतर शिवाजीबापू दुसर्‍यांदा श्रीगोंद्याचे आमदार झाले.

विद्यमान आमदार असल्याने शिवाजीबापू नागवडे यांना 2004 मध्ये काँग्रेसकडून पुन्हा उमेदवारी मिळाली. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असल्याने पाचपुते यांनी पक्षीय लेबल बाजूला ठेवत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. बाबासाहेब भोस अपक्ष, स्वतंत्र भारत पक्षाचे अनिल घनवट, रासपकडून नंदकुमार बोरुडे हेही त्या वेळी मैदानात उतरले. मतविभागणीचा फायदा पुन्हा पाचपुते यांना झाला अन् ते आमदार झाले. पाचपुतेंना या काळात मंत्रिपदाची संधी मिळाली.

पुढे श्रीगोंद्याच्या राजकारणात पक्षीय पातळीवर बदल होऊन नागवडे कुटुंब भाजपात गेले. 2009च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बबनराव पाचपुते यांना उमेदवारी दिली, तर भाजपने राजेंद्र नागवडेंना. आता शिवाजीबापू यांचे चिरंजीव राजेंद्र हे भाजपकडून लढत असताना अण्णासाहेब शेलार यांनी अपक्ष उडी घेतली आणि बाबासाहेब भोस हेही जनसुराज्य शक्ती या पक्षाकडून विधानसभेच्या रिंगणात उतरले.

याही वेळी जवळपास 27 हजारांचे मताधिक्य मिळवत पाचपुते पुन्हा आमदार झाले. अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात दादांना पुन्हा संधी मिळाली. सोबतच जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही मिळाले. या निवडणुकीत शेलार यांना 34626 आणि भोस यांना 10543 मते मिळाली होती.

सगळेच राजकीय पक्ष 2014ची विधानसभा स्वतंत्रपणे लढल्याने श्रीगोंद्यातही चौरंगी लढत झाली. बबनराव पाचपुते यांनी ‘घड्याळ’ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीकडून राहुल जगताप यांना उमेदवारी मिळाली. शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, काँग्रेसकडून हेमंत ओगले यांनी विधानसभेची निवडणूक लढविली.

या लढतीत राहुल जगताप 13637 मतांनी विजयी झाले. पाचपुते यांचे पक्षांतर शरद पवारांच्या जिव्हारी लागले होते. त्यामुळे त्यांनी पाचपुते यांच्या पराभवासाठी जगताप-नागवडे यांना एकत्र आणत बबनदादांचा पराभव करण्यात मोठी भूमिका बजावली होती.

विद्यमान आमदार असतानाही 2019 मध्ये राहुल जगताप यांनी विधानसभा लढण्यास नकार दिला. राजेंद्र नागवडे यांच्याकडेही पवारांनी उमेदवारीची विचारणा केली; पण तेही नको म्हणाले. त्यामुळे घनश्याम शेलार यांना उमेदवारी मिळाली. पाचपुते पुन्हा भाजपकडून लढले. शेलार यांचा 4750 निसटत्या मतांनी पराभव झाला. बबनदादा सातव्यांदा आमदार होतानाच श्रीगोंद्यात प्रथमच भाजपचे कमळ फुलले.

पुढील पाच वर्षांत पाचपुते यांना आजारपणाला सामोरे जाण्याची वेळ आली; मात्र पक्षाची सगळी धुरा त्यांचे चिरंजीव विक्रमसिंह यांनी सांभाळत संघटना बांधणी केली. भाजपातून काँग्रेस अन् पुढे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले राजेंद्र नागवडे उमेदवारीसाठी थेट उबाठा शिवसेनेत पोहचले. नागवडेंचा हा सेनाप्रवेश होताच मविआकडून उमेदवारी फिक्स असल्याचे मानणारे राहुल जगताप यांना धक्का बसला.

पक्षप्रवेश अन् लगेच उमेदवारी, असा नागवडेंचा ‘योग’ जुळून आला. तिकडे महाविकास आघाडीने उमेदवारी डावलली म्हणून राहुल जगताप यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतला; तर काँग्रेसकडून उमेदवारी मागणारे घनश्याम शेलार हेही अपक्ष उमेदवारी करत आहेत. भाजपने यंदा उमेदवारी बदलत बबनदादांऐवजी त्यांच्या पत्नी प्रतिभा यांना संधी दिली. मात्र त्यांच्या उमेदवारीवरून पाचपुते कुटुंबात मत-मतांतर सुरू झाले (दादांच्या प्रकृतीची काळजी घेण्यावरून). आता विक्रम पाचपुते यांच्या उमेदवारीची मागणी पुढे आली आहे. त्यामुळे भाजपची उमेदवारी बदलण्याचे संकेत मिळत आहेत.

दुसरीकडे शिवसेनेत नव्यानेच दाखल झालेले राजेंद्र नागवडे यांच्या पत्नी अनुराधा यांना उमेदवारी मिळाली असली, तरी त्यांना पक्ष संघटनेशी एकरूप होण्यासोबतच आघाडीचे घटकपक्ष राष्ट्रवादी व काँग्रेसला सोबत घेताना ‘कस’रत करावी लागत असल्याचे चित्र आहे. मतविभागणी झाली, तर त्यांचा लाभ पाचपुते यांना होतो, असे यापूर्वीच्या निवडणुकांतून दिसून आलेच आहे. आता इतिहासाची पुनरावृत्ती होणार की एकास एक लढत देऊन नागवडे-पाचपुते पुन्हा भिडणार, हे सोमवारी समोर येणारच आहे.

राजेंद्र नागवडेंनी नाकारली होती शरद पवारांची ऑफर!

2014 च्या निवडणुकीत पाचपुते यांनी शरद पवारांची साथ सोडली होती. ते सोडून जाणे शरद पवारांच्या जिव्हारी लागले होते. त्यामुळे त्यांनी श्रीगोंद्यात लक्ष घालून पाचपुतेंच्या विरोधात उमेदवारी करणारे राहुल जगताप यांच्यामागे नागवडेंची ताकद उभी केली होती. जगताप-नागवडे जोडगोळीने पाचपुते यांचा पराभव केला होता. 2019ला भाजपची ‘हवा’ होती. त्यामुळे सगळेच भाजपात जाण्याच्या मानसिकतेत होते.

मात्र उमेदवारी बबनराव पाचपुते यांना मिळाली. त्यांच्या विरोधात उमेदवारी करण्याला विद्यमान आमदार असतानाही राहुल जगताप यांनी पक्षाला नकार कळविला. त्यानंतर राजेंद्र नागवडे यांना शरद पवारांनी उमेदवारीबाबत विचारणा केली; मात्र त्यांनी उमेदवारीची ऑफर नाकारली. त्यामुळे ऐन वेळी घनश्याम शेलार यांना उमेदवारी मिळाली. ऑक्टोबर 2019मध्ये श्रीगोंद्यातील सभेत शरद पवारांनी बबनराव पाचपुते यांच्या विरोधात जोरदार भाषण ठोकल्याने एकतर्फी वाटणारी निवडणूक फिरल्याचे दिसू लागले. त्यामुळेच शेलार यांना तब्बल 98 हजार मते मिळाली; मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला.

आघाडी धर्माचे असेही पालन!

स्व. बापूंचे चिरंजीव राजेंद्र नागवडे 2009 मध्ये भाजपचे उमेदवार होते. त्यांच्या विरोधात बबनराव पाचपुते आघाडीचे उमेदवार असले तरी बापूंनी आघाडीचा धर्म पाळताना जाहीरपणे भाजपच्या स्टेजवर जाणे टाळले. अर्थात त्यांनी मुलांसाठी प्रचारयंत्रणा राबविली, पण ती आघाडी धर्म पाळूनच.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news