श्री रामनवमी मिरवणूक मार्ग जैसे थे..! पोलिस प्रशासन भूमिकेवर ठाम

ड्रोन, सीसीटीव्ही, व्हीडिओद्वारे होणार चित्रीकरण
Ahilyanagar News
श्री रामनवमी मिरवणूक मार्ग जैसे थे..! पोलिस प्रशासन भूमिकेवर ठामPudhari
Published on
Updated on

नगर: श्रीराम नवमीनिमित्त अहिल्यानगर शहरात हिंदुत्ववादी संघटनातर्फे दरवर्षी प्रभू श्रीरामच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येते. मिरवणूक आशा टॉकिज चौकातून नेण्याची मागणी संघटनांनी केली. मात्र, पोलिस प्रशासनाने त्यांना परवानगी दिलेली नाही. गेल्या काही वर्षांपासून ज्या मार्गाने मिरवणूक जाते त्याच मार्गाने मिरवणुकीला परवानगी देण्यात आली.

दरम्यान, पोलिस प्रशासनाने बंदोबस्तासाठी चौका-चौकात फिक्स पाईंट केले असून, ड्रोन, सीसीटीव्ही, व्हिडिओद्वारे मिरवणुकीचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रविवारी (दि. 6) श्रीराम नवमीनिमित्त शहरातून सकल हिंदू समाज, विविध हिंदुत्वावादी संघटनांतर्फे श्रीराम नवमीनिमित्त प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी चार मंडळांनी परवानगी घेतली आहे. दरम्यान, माळीवाडा, पंचपीर चावडी, आशा टॉकीज, माणिक चौक, भिंगारवाला चौक, कापड बाजार चितळे रोड अशा मार्गाने मिरवणूक काढण्यात येईल, अशी भूमिका संघटनेतर्फे घेण्यात आली आहे.

परंतु, पोलिस प्रशासनाने 2015 मध्ये मिरवणुकीत दंगलीची घडल्याने जिल्हाधिकारी यांनी मिरवणूक मार्ग बदलून माळीवाडा, पंचपीर चावडी, जुना मंगळवार बाजार, बॉम्बे बेकरी, चॉद सुलताना हायस्कूल, माणिक चौक, भिंगारवाला चौक, कापड बाजार असा मार्ग दिला होता. त्याच मार्गाने 2017, 18, 19, 22, 23 मध्ये मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे याच मार्गाने मिरवणूक निघेल अशी ठाम भूमिका पोलिस प्रशासनाने घेतली आहे.

मात्र, हिंदुत्ववादी संघटना पहिल्या वर्षीच्या मार्गासाठी आग्रही आहेत. त्यामुळे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. आमदार संग्राम जगतापही पहिल्याच जुन्या मार्गासाठी आग्रही आहेत. मिरवणूक मार्गाची पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पाहणी केली असून, मिरवणूक मार्गावरून वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला.

अपर पोलिस अधीक्षकांसह सुमारे 35 अधिकारी व 600 पोलिस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिरवणूक मार्गावर ड्रोन कॅमेर्‍यांद्वारे नजर ठेवली जाणार असून मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी व्हिडिओ कॅमेरे तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याचबरोबर चौका-चौकात फिक्स पाईंट नेमण्यात आले आहेत. त्यामुळे मिरवणुकीत उद्या काय होणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.

मिरवणूक मार्गावर नो व्हेईकल झोन

श्रीराम नवमी उत्सवानिमित्त शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूक शहरातील मुख्य बाजारपेठेतून जाणार आहे. त्यामुळे मार्गावर वर्दळ राहणार असल्याने शहर वाहतूक शाखेने हा मार्ग नो व्हेईकल झोन (वाहन विरहीत क्षेत्र) केला आहे. 6 एप्रिल रोजी दुपारी दोन ते रात्री आठपर्यंत वाहनांना प्रवेश बंद असणार आहे.

असा आहे मार्ग...

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- माळीवाडा वेस - पंचपीर चावडी - मदवाशा दर्गा - बॉम्बे बेकरी चौक- चाँद सुलताना हायस्कूल- माणिक चौक- भिंगारवाला चौक - कापडबाजार- तेलीखुंट- नेता सुभाष चौक- चितळे रोड- मिरवली बाबा दर्गा- चौपाटी कारंजा - दिल्ली गेट. या मार्गावर शासकीय वाहने, मिरवणुकीतील वाहने, अ‍ॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड यांना प्रवेश राहील.

शहरातून 222 जण हद्दपार

श्रीराम नवमी मिरवणुकीत 2015 मध्ये दंगल झाली. त्यावेळी मिरवणुकीसाठी परवानगी घेतली नव्हती, असे पोलिस प्रशासन सांगत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था नियंत्रित रहावा, यासाठी पोलिस व प्रांताधिकार्‍यांनी शहरातील सुमारे 222 जण एक दिवसाकरिता हद्दपार केले आहेत. त्याच्याविरुद्ध गंभीर तर हिंदू-मुस्लिम असे जातीय गुन्हे आहेत. त्यात तोफखाना 88, कोतवाली 74, भिंगार कॅम्प 60 जणांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news