पाथर्डी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेतील कामे दोन वर्षांपासून तालुक्यात संथ गतीने सुरू आहेत. अजूनही लोकांना पाणी मिळाले नाही. ठेकेदार मनमारी कारभार करत असून, दमबाजीची भाषा गावातील लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकार्यांना करत आहे.
योजनेच्या जलवाहिनीची कामे ठिकठिकाणी अर्धवट स्थितीत, तर कुठे पाण्याच्या टाक्या झाल्यात मात्र त्याही अर्धवट आहे. काही गावात निकृष्ट पद्धतीने टाक्यांचे काम सुरू आहे. अधिकार्यांच्या हलगर्जीमुळे सरकारला भुर्दंड सोसण्याची वेळ आली असून, आता टँकरने पाणी मागण्याची वेळ आमच्यावर आली आहे, असे अनेक आरोप करून प्रादेशिक नळ पाणीपुरवठा व जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांवर तालुक्यातील गावातील लोकप्रतिनिधींनी टंचाई आढावा बैठकीत धारेवर धरले.
शेवगाव-पाथर्डी आ. मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याची टंचाई आढावा बैठक पाथर्डी तहसील कार्यालयात घेण्यात आली. त्या वेळी पिण्याच्या पाण्याच्या सुरू असलेल्या योजनांच्या कामावरून अनेक गावच्या लोकप्रतिनिधींनी आ. राजळे यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला.
या वेळी तहसीलदार उद्धव नाईक, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, मृणाल धगधगे, अनिल सानप, एम. बी. लोंढे, वसंत बडे, संतोष मुटकुळे, अरुण साबळे, दिग्विजय पाटील हे शासकीय अधिकारी; तर अशोक चोरमले, सुभाष बर्डे, धनंजय बडे, बंडू पठाडे, भगवान आव्हाड, मुकुंद गर्जे, विष्णुपंत अकोलकर, सुनील परदेशी, सुनील ओव्हाळ, चारुदत्त वाघ, नारायण पालवे, नितीन गर्जे, पांडुरंग लाड, मुकुंद आंधळे, समीर पठाण, मंगल कोकाटे, ज्योती शर्मा आदी उपस्थित होते.
प्रत्येक गावातील निकृष्ट व अर्धवट स्थितीच्या आणि भोंगळ कारभाराच्या पाणी योजनेबद्दल तक्रारी आल्यानंतर ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करून दंडात्मक कारवाई करा, असा सूर सर्वांनीच बैठकीत आळवला.
बैठकीदरम्यान आ. राजळे म्हणाले की, पाथर्डी तालुक्यातील जलजीवन योजनेंतर्गत सुरू असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या कामांमध्ये पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने मोठ्या प्रमाणावर कामे अपूर्ण आहेत. त्या ठिकाणी कामाची अडचण नसेल तर ठीक आहे. मात्र, ठेकेदार काम करत नसेल तर अशा ठेकेदारांना नोटिसा काढा. दंडात्मक कारवाई करा.
पाथर्डी तालुक्यातील भगवानगड 46 गावे, अमरापूर माळी बाभूळगाव 54 गावे व जिल्हा परिषदेच्या 32 गावांच्या या पाणी योजनेच्या कामात पूर्ण दुर्लक्ष झाल्याने मोठ्या प्रमाणावर अर्धवट कामाने पाणीटंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचे आलेले टँकरचे प्रस्ताव मंजूर करून येणार्या टँकर प्रस्तावाला मंजुरी देण्याच्या सूचना आ. राजळे यांनी टंचाई आढावा बैठकीत तहसीलदार व गटविकास अधिकार्यांना दिल्या आहेत.
सध्या टंचाईचा काळ सुरू आहे. लोकांचा पाण्याचा प्रश्न असून, आठ दिवसांपूर्वीही आपण आढावा बैठक आयोजित करण्याचे सुचित केले होते. कोण ग्रामसेवक गैरहजर आहे? त्याची नोंद घेण्याची सूचना आ. राजळे यांनी गटविकास अधिकार्यांना बैठकीपूर्वी दिल्या. प्रास्ताविक उद्धव नाईक यांनी, तर सूत्रसंचालन मनोज खेडकर यांनी करून आभार भानुदास गुंजाळ यांनी मानले.
अधिवेशनानंतर कामांची पाहणी करणार
तालुक्यात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील माहिती कागदावरची अधिकार्यांकडून सांगितली जाते. मात्र, प्रत्यक्षात कुठे काम चालू आहे, कुठे बंद आहे? सत्य परिस्थिती काय आहे? त्यासाठी आता संबंधित योजनेतील सर्व अधिकार्यांबरोबर सुरू असलेल्या प्रत्येक गावातील पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी स्वतः अधिवेशन संपल्यावर दि. 28नंतर करणार असल्याचा आ. राजळे म्हणाल्या.
आ. राजळेंकडून अधिकार्यांची कानउघाडणी
अनेक गावात जलजीवन योजनेंतर्गत पाणी योजनेचे काम चांगल्या पद्धतीने होत नाही. गावागावातील असलेले आजी-माजी सरपंच यांच्या निदर्शनात या बाबी आहे. आणि तुम्ही सांगता काम व्यवस्थित होते आहे. तुम्ही ठेकेदाराची का बाजू घेतात? असे आ. राजळे यांनी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे अधिकारी मृणाल धगधगे यांना बैठकीत सुनावले.