महाराष्ट्र केसरी स्पर्धा : शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाडची विजयी सलामी

महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्यांना प्रारंभ
maharashtra kesari
महाराष्ट्र केसरी स्पर्धाPudhari
Published on
Updated on

कै. बलभीमअण्णा जगताप क्रीडानगरी (नगर) : 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या फेरीला आज गुुरुवारी प्रारंभ झाला. माती विभागात सोलापूरचा महेंद्र गायकवाड विरुद्ध पुणे शहरचे तानाजी झुंजुर्के यांच्या लढतीमध्ये महेंद्र गायकवाड याने विजय सलामी दिली. गादी गटामध्ये डबल महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे याने नांदेडकडून खेळताना वाशिमच्या राहुल सुळ याचा पराभव करीत विजयी सलामी दिली. अशी माहिती शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा कुस्ती स्पर्धा प्रमुख दिनेश गुंड यांनी दिली. सांगलीचे संदीप मोटे यांनी वर्ध्याचे जगदीश पटेकर यांना धूळ चारली. ठाण्याचे दीपक बदकविरुद्ध सातारचे गणेश कुंकुले यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत गणेश कुंकुले यांनी बाजी मारली. सोलापूरचा वेताळ शेळके विरूद्ध अकोलेचा सुमीत गवई यांच्या लढत झाली. त्यांच्यात वेताळ शेळके यांनी बाजी मारली. अमरावती माऊली जमदाडे विरुद्ध चंद्रपूरचे श्रीनिवास पाथरूट अशी लढत झाली. या लढतीमध्ये माऊली जमदाडे विजय ठरले.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी गादी विभागामध्ये पात्रता फेरीमध्ये धुळ्याचा हर्षवर्धन सोनवणे विरुद्ध मुंबईचा शरद मिटकरी अशी लढत झाली. यामध्ये शरद मिटकरी विजयी झाला. त्याचबरोबर गादी गटामध्ये धाराशिवचा धीरज बारस्कर, परभणीचा वैभव माने, सोलापूरचा रामचंद्र कांबळे, सोलापूरचा सागर खरात, नांदेडचा शिवराज राक्षे विजय झाला आहे.

86 किलो वजन गटामध्ये माती विभागामध्ये धुळेचा चंद्रशेखर गवळी याने गोल्ड, धाराशीवचा हनुमंत पुरी याने सिल्वर तर सोलापूरच्या सुनील जाधव यांनी ब्रांझ मेडल पटकाविले.

57 किलो माती गटात सोलापूरचा सौरभ इगवेने गोल्ड, कोल्हापूरच्या दिग्विजय पाटील याने सिल्वर तर पुणे जिल्ह्यातील ओमकार निगडे याने ब्राँझ मेडल पटकाविले.

सिकंदर शेख आखाड्याबाहेर

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी नावाजलेला नामांकित मल्ल सिकंदर शेख स्पर्धेत सहभागी झाला नाही. सिकंदर शेख याची प्रवेशिका आलेली नाही तसेच त्याचे व्हाईट कार्डही आलेले नाही. परिणामी तो महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभागी झाला नसल्याची माहिती महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिली. सिकंदर शेख देशभरात जिगरबाज मल्ल म्हणून ओळखला जातो. अहिल्यानगरमधील 67 व्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेमध्ये तो सहभागी न झाल्याने रोमांचकारी कुस्ती प्रेक्षकांना पहायला मिळणार नाही.

धाराशिवचा सरनोबतला सुवर्णपदक

धाराशिवचा मुताम्बीर सरनोबत आणि अहिल्यानगरचा महेश फुलमाळी यांच्यात 86 किलो गादी गटात फायनल झाली. त्यात सरनोबत याने महेश फुलमाळीवर मात करत सुवर्णपदक पटकावलं. याच गटात सोलापूरचे स्वप्नील काशिद आणि गौतम शिंदे यांना ब्राँझ मेडल विभागून देण्यात आले. 57 किलो वजनी गटामध्ये कोल्हापूरच्या वैभव पाटीलने सुवर्ण, नाशिकच्या शुभम आजपळेने सिल्वर पदक पटकाविले तर सोलापूरचा अविराज माने आणि कोल्हापूरच्या रोहित पाटील यांना ब्राँझ पदक विभागून देण्यात आले.

महाराष्ट्र केसरी पुन्हा मैदानात

महाराष्ट्र केसरी किताब विजेते शिवराज राक्षे, बाला रफीक, हर्षवर्धन सदगीर पुन्हा महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यात आज शिवराज राक्षे यांनी गादी विभागात विजयी सलामी दिली. तर, नामवंत मल्ल ज्ञानेश्वर उर्फ माऊली जमदाडे, महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरीच्या पात्रता फेरीत विजयी झाले आहे. अहिल्यानगर केसरी महेंद्र गायकवाड माती विभागातून लढत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news