नगर तालुका: नगर तालुक्यात बुधवारी (दि. 11 )रोजी वादळी पावसामुळे शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकर्यांसह सर्वांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना आमदार शिवाजी कर्डिले यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या आहेत.
बुधवारी सायंकाळी संपूर्ण तालुक्यात वादळी वार्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वार्यामुळे विविध भागांत शेतकरी व नागरिकांचे नुकसान झाले. कांद्याच्या वखारीवरील पत्रे उडाल्याने काही भागात कांदा भिजला आहे. तसेच घरावरील पत्रे, पडवी, जनावरांचे गोठ्यावरील पत्रे उडाल्याने दुग्ध व्यवसायाचे नुकसान झाले. नागरिकांनाही वादळी पावसाचा फटका बसला आहे. (Latest Ahilyanagar News)
विजेचे खांब व तारा तुटल्याने संपूर्ण तालुक्यातील वीज गायब झाली आहे. आमदार कर्डिले यांनी तहसीलदार, महावितरण अधिकारी, कृषी अधिकारी, तसेच ग्रामविकास अधिकार्यांना नुकसानीची पाहणी करून तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आपत्तीग्रस्त परिस्थितीत सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची तसेच नुकसान झालेले शेतकरी व नागरिकांना लवकरच मदत मळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. कर्डिले यांनी सांगितले.
वादळी वार्यासह शेतकरी, दुग्ध व्यवसायिक, सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले. त्यांचे तत्काळ पंचनामे करण्यात येणार आहेत. नुकसान झालेल्या शेतकर्यांना लवकर आर्थिक मदत देण्यात येईल. आपत्तीग्रस्त परिस्थितीत सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे, असे कर्डिले म्हणाले.