सरत्या वर्षाला निरोप आणि साईदर्शनाने नववर्षाची सुरूवात करण्याकरीता आलेल्या भाविकांच्या गर्दीने शिर्डी फुलून गेली. दुरवरून पायी दिंड्यांनी शिर्डीत दाखल झालेल्या भाविकांनी साईनामाचा गजर करत नववर्षाचे स्वागत केले. साईभक्तांच्या दर्शनासाठी साई समाधी मंदिर रात्रभर उघडे ठेवण्यात आले होते.
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भाविकांचा दरवर्षीच जनसागर उसळतो असतो. साईभक्तांना समाधीचे मनोभावे दर्शन घेता यावे, यासाठी संस्थान प्रशासनाने मंदिर रात्रभर उघडे ठेवत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
25 डिसेंबरपासूनच शिर्डीत भाविकांची गर्दी होण्यास प्रारंभ झाला आहे. मंगळवारी 31 डिसेंबरला शिर्डीत लाखो भाविक उपस्थित असल्याची प्रचिती आली. शिर्डी महोत्सवा निमित्त बेंगलोर येथील दानशूर साईभक्त बी.ए.बसवराज यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. साईमंदिरासह शिर्डी शहरातील हॉटेल व्यवसायकांनीही हॉटेलवर रोषणाई केल्याचे दिसून आले. शिर्डीतील सर्वच हॉटेल हाऊसफुल झाली आहेत. भाविकांसाठी साईबाबा संस्थानने साई प्रसाद भोजनालयात सुविधा उपलब्ध करून दिली होती, तेथे सुमारे लाखभर भाविकांनी भोजनाचा अस्वाद घेतला. यंदा प्रथमच महोत्सवात साईभक्त भाविकांसाठी मागेल तितके लाडू प्रसाद पाकीट विविध काऊंटर उपलब्ध करून देण्यात आली होती. 120 क्विंटल साखरेचे बुंदी प्रसाद पाकिटे तर 400 क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू प्रसाद पाकिटे साईभक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. भाविकाच्या सेवेसाठी साई एम्पलॉईज सहकारी सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चप्पल व मोबाईल ठेवण्यासाठी लॉकर सुविधा उपलब्ध केली. मंदिर परिसरात कोठेही चप्पल सोडल्याचे चित्र या सुविधेमुळे यंदा प्रथमच दिसले नाही. अनेक दुकानात ‘माफक दरात’ असा फलक लावत हार विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. अनेक वर्षानंतर साईच्या समाधीवर हार, गुलाबपुष्प चढवले जात असल्याने अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. माजी खासदार डॉ सुजय विखे यांच्या पाठपुराव्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार समाधीवर फुले अर्पण करण्यास सुरूवात झाली आहे.
साईभक्त भाविकांना त्रास होणार नाही किंवा आर्थिक शोषण व फसवणूक होणार नाही तसेच कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला, उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे, पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, वाहतूक शाखेचे निरीक्षक प्रदीप देशमुख, साईमंदिर सुरक्षेचे पोलिस उपनिरीक्षक रोहीदास माळी यांच्यासह पाच सहाय्यक पोलिस निरीक्षक, 145 अंमलदार 210 होमगार्ड आणि साई मंदिरातील 975 सुरक्षा रक्षक, अतिशिग्र कृती दलाच्या दोन प्लाटून बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.