

बोधेगाव : शेवगाव-गेवराई राज्यमार्गावरील अतिक्रमणधारकांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोटिसा मिळताच अनेकांनी मुदतीच्या पूर्वीच स्वतःहून अतिक्रमणे हटविण्यास प्रारंभ केला. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमणे हटविण्यात प्रारंभ केल्याने रस्त्याचा श्वास मोकळा होत आहे.
राज्यभरातील रस्ते, महामार्ग, औद्योगिक वसाहतीमधील अतिक्रमणे काढण्याची मोहीम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतली. त्याप्रमाणेच बोधेगाव, बालमटाकळी, राक्षी, चापडगाव, सुकळी,येथील शेवगाव-गेवराई राज्य महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यासाठी अतिक्रमणधारकांना सहा दिवसांपूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामध्ये काही दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
त्यामुळे राज्यमार्गावरील 15 मीटरच्या आतील सर्व अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटिसाही बजावल्या आहेत . याबाबत संबंधित अतिक्रमण धारकांना व व्यावसायिकांना नोटिसा बजावून काही दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे व्यावसायिकांध्ये खळबळ उडाली आहे.
अनेक व्यावसायिकांनी आपल्या मालमत्तेचे आर्थिक नुकसान होऊ नये, तसेच आपल्यावर गुन्हाही दाखल दाखल होऊ नये, या हेतूने अनेकांनी अतिक्रमणे स्वतःहून काढत प्रशासनाला सहकार्य केले जात आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणच्या व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणे स्वत पुढाकार घेऊन काढून घेतली जात आहेत. त्यामुळे गजबलेला परिसर मोकळा होताना दिसत आहे.
बांधकाम विभागाची अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा सुरू होईल. तोपर्यंत व्यावसायिकांनी अतिक्रमणे काढून प्रशासनास सहकार्य करावे. भविष्यात मालमत्तेचे होणारे नुकसान टाळा, असे आवाहन उपअभियंता प्रल्हाद पाठक यांनी केले.
वाहतूक कोंडी होतेय कमी
व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीन अतिक्रमणे काढल्याने याठिकाणी दररोज होणारी वाहतूक कोंडी दूर झाली आहे. आठवडे बाजाराच्या दिवशी या परिसरातून पायी चालणेही मुश्किल असते. मात्र, हा नेहमी गाजबलेला परिसर हळूहळू मोकळा होताना दिसत आहे.