

पाथर्डी: शहरातील चिंचपूर रोडवरील मुख्य रस्त्यावर गटाराचे दूषित पाणी रस्त्यावर वाहत असल्याने स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि वाहनचालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नवीन नगरपरिषद इमारतीसमोरील गटार पूर्णपणे तुंबली असून, येथील घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे.
उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते मारुती मंदिरापर्यंत गटाराचे पाणी पसरले असून, या रस्त्यावरून जाणार्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे हे दूषित पाणी आजूबाजूच्या परिसरात उडते. यामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली असून, स्थानिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. (Latest Ahilyanagar News)
या रस्त्यावर बुधवारी भरणार्या आठवडे बाजारात शेतकरी, भाजीपाला आणि फळविक्रेत्यांना या दूषित पाण्यासमोर बसून व्यवसाय करावा लागतो. परिसरातील छोटी-मोठी दुकाने, बँक, शासकीय रुग्णालय आणि हॉटेल यांच्यासह वर्दळीच्या ठिकाणी गटाराच्या पाण्यामुळे ग्राहकांना आणि व्यावसायिकांना उग्र त्रास सहन करावा लागत आहे.
गटाराचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने दुकानासमोर दुर्गंधी पसरली आहे. ग्राहक येण्यास कचरतात, याचा थेट परिणाम आमच्या व्यवसायावर होत आहे, अशी खंत स्थानिक दुकानदारांनी व्यक्त केली.
स्थानिक नागरिकांनी याबाबत पाथर्डी नगरपरिषदेकडे अनेकदा तोंडी तक्रारी केल्या. परंतु प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. आम्ही वारंवार तक्रारी करतो, पण नगरपरिषदेचे अधिकारी फक्त आश्वासने देतात. प्रत्यक्षात गटारे स्वच्छ करण्यासाठी कोणतीही हालचाल होत नाही, अशी तीव्र नाराजी स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली.
विशेषतः रुग्णालयासमोरील गटाराच्या पाण्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अस्वच्छ परिसरातून वाट काढावी लागत आहे, ज्यामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
चिंचपूर रोड हा पाथर्डीतील प्रमुख वाहतूक मार्ग असून, येथे सतत वाहनांची ये-जा सुरू असते. गटाराचे पाणी रस्त्यावर पसरल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. पाण्यामुळे रस्ता निसरडा झाला असून, अपघाताचा धोका वाढला आहे.
याशिवाय, पाण्यातून उडणारी दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे परिसरातील हवा प्रदूषित होत आहे, ज्याचा थेट परिणाम स्थानिकांच्या आरोग्यावर होत आहे. हा रस्ता रुग्णालयाकडे जातो, पण गटाराच्या पाण्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होत आहे. प्रशासनाला याची जाणीव आहे, तरीही ते गप्प का? असा सवाल स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्यानी उपस्थित केला. पाथर्डी नगरपरिषदेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
जबाबदारीकडे दुर्लक्ष
गटारांची नियमित स्वच्छता आणि देखभाल ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी आहे. परंतु याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यापूर्वीही पाथर्डी नगरपरिषदेने स्वच्छता आणि पायाभूत सुविधांबाबत हलगर्जीपणा दाखविल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
गटारांची त्वरित दुरुस्ती करा
गटाराचे पाणी रस्त्यावर वाहणे हे केवळ अस्वच्छतेचा प्रश्न नाही, तर डासांचे प्रमाण वाढणे, पाण्यामुळे होणारे रोग आणि हवेचे प्रदूषण यासारख्या गंभीर समस्यांना निमंत्रण आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. स्थानिकांनी नगरपरिषदेला तातडीने गटाराची स्वच्छता आणि दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.