

संगमनेर शहर : संगमनेर नगर पालिका व पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे अवैध कत्तलखान्यांविरोधात मोहीम उघडली. संबंधित अतिक्रमणग्रस्त बांधकामे जमिनदोस्त करत असताना पोलिसांना चारशे किलो कुजलेले गोमास आढळले. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कत्तलखान्यांचे अतिक्रमण बांधकाम जमिनदोस्त करण्याची कारवाई करण्यात आली.
नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे, उपनगर अभियंता महेश गोर्डे, अल्ताफ शेख, भीमाशंकर वर्पे, जयराम मंडलिक, पंकज मुंगसे यांच्यासह पालिकेच्या कर्मचार्यांचे पथक व संगमनेरचे पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथक संयुक्तरित्या अवैध बांधकामे व बेकायदेशीर कत्तलखान्याचे बांधकामे पाडण्याचे काम करत होते.
जमजम कॉलनीमधील अवैध कत्तलखान्याचे अतिक्रमण काढून पथक मौलाना आझाद मंगल कार्यालयामागील रमाई गार्डन शेजारी असलेल्या गुलाम हुसेन कुरेशी यांच्या अवैध अतिक्रमण काढत असताना पथकाला गोवंश जनावरांचे कुजलेले अवशेष आढळून आले. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या आदेशावरून तात्काळ या कुजलेल्या अवस्थेतील तब्बल चारशे किलो वजनाच्या या अवशेषाचा पंचनामा करण्यात आला. लॅब तपासणीसाठी या गोवंश अवशेषाचे काही नमुने ताब्यात घेत उर्वरित सर्व अवशेष जेसीबीच्या सहाय्याने खड्डा घेऊन जमिनीत नष्ट करण्यात आले.
सदरचे शेड हे गुलाम हुसेन कुरेशी याच्या मालकीचे असल्याने त्याला तात्काळ नोटीस देत शेड काढून टाकण्यास सांगण्यात आले. तसेच संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलिस शिपाई अतुल उंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुलाम हुसेन कुरेशी याच्या विरोधात राज्यात गोवंश जनावरांच्या कत्तलीस मनाई असताना गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून त्यांचे कुजलेले अवशेष पत्राच्या शेडमध्ये ठेवले असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.