

पाथर्डी : तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावरील बहुतांश पुलांचे डिझाईन चुकल्यामुळे ते अतिवृष्टीमुळे पूर्णपणे खचले. त्याला राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारीच जबाबदार आहेत. त्यांच्या निष्काळजीपणामुळे एवढी वाताहत झाली, असा आरोप पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी केला.(Latest Ahilyanagar News)
पालकमंत्री विखे पाटील यांनी आज पाथर्डी तालुक्यातील माळी बाभुळगाव, चांदगावरोड, कारेगाव येथील नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर मोहटे गडावर जाऊन देवीचे दर्शन घेतले. गडावर अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
गेल्या 50-60 वर्षांत झाला नाही एवढा मोठा पाऊस यंदा झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पाथर्डी-शेवगाव तालुक्यात एक लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले. नालाबंडिंग पाझरतलाव, बंधारे, रस्ते, रस्त्यावरील पूल यांचे मोठे नुकसान झाले, अशी माहिती पालकमंत्री विखे पाटील यांनी या वेळी दिली. याबाबत शासनाचा सर्व खात्यांनी एकत्रितपणे काम करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
विखे पाटील म्हणाले, पाथर्डी तालुक्यात मोठा पाऊस झाला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी केलेले पूल पूर्णपणे खचले आहेत. त्यांच्या निष्काळजीपणामुळे एवढी वाताहत झाली आहे. काही ठिकाणी पुलाचे डिझाईन चुकल्यामुळे पूल खचून गेले, तर काही ठिकाणी वाहून गेल्याचे प्रकार घडले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी राष्ट्रीय महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र देणार असल्याचेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
सध्या पावसाचा जो थेंब पडतो तो वाहत असल्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. मोठ्या पावसामुळे शेतातील काळी माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. यावर मार्ग काढला जाईल, असेही ते म्हणाले.
आमदार मोनिका राजळे, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भंडारी, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार डॉ उद्धव नाईक, पोलिस निरीक्षक विलास पुजारी, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुनराव शिरसाट, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, धनंजय बडे, माजी उपसभापती विष्णुपंत अकोलकर, बंडू पठाडे, भगवान आव्हाड, अजय रक्ताटे आदी पालकमंत्र्यांसमवेत पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते.