तरुण-तरुणीचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ

मृतदेहाचा काही भाग वन्य प्राण्यांनी खाल्ला
Kej body found
प्रातिनिधिक छायाचित्रFile Photo
Published on
Updated on

पाथर्डी : तालुक्यातील घुमटवाडी शिवारात तरुण-तरुणीचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह शनिवारी रात्री आढळले. प्रसाद सुरेश मरकड (वय 24, रा. दुलेचांदगाव), भाग्यश्री शंकर वखरे (वय 23, रा.माळेगाव, ता.पाथर्डी) अशी त्यांची नावे आहेत.

पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी परिसरातील घुमटवाडीच्या शिवारात या दोघांचे मृतदेह वन विभागाच्या हद्दीतील जमिनीवर आढळून आले . प्रसाद याचा मृतदेह एका झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत तर भाग्यश्री हिचा मृतदेह जमिनीवर आढळले. दोघांचे मृतदेह पाथर्डीचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलिस निरीक्षक हरीश भोये, विलास जाधव या अधिकार्‍यांसह पोलिस पथकाने ताब्यात घेतले. घटनास्थळी दोघांचे मृतदेह हे अर्धवट जळालेल्या स्थितीत होते. भाग्यश्रीच्या मृतदेहाचा काही भाग वन्य प्राण्यांनी खाल्लेला आढळून आला आहे. वन विभागाचा हा परिसर असल्याने येथील परिसराला आग लागल्याने हे मृतदेह जळाले असावेत अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

घटना घडली त्या बाजूलाच पोलिसांना विषारी औषध व थंडपेयाच्या रिकामा बाटल्या मिळाल्या आहेत. त्यामुळे या घटनेचा सर्व बाजूने पोलिस तपास करीत आहेत. पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील या वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रसाद व भाग्यश्री हे दोघेही गेल्या दहा दिवसापासून घर सोडून बाहेर होते. या दोघांच्या नातेवाईकांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात तशी तक्रार दाखल केली होती. प्रसाद मरकड हा अविवाहित तरुण होता, तर भाग्यश्री वखरे हिचा विवाह झाला असून तिला एक मुलगा आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीश भोये हे घटनेचा तपास करत असून पोलिस हेडकॉन्स्टेबल सुहास गायकवाड हे मदत करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news