नगर : सावेडी उपनगरातील भिस्तबाग चौक येथे महानगरपालिकेच्या नो पार्किंग झोनमध्ये लावले वाहन हटविण्यास सांगितल्याने चालकाने महिला पार्किंग अटेंडंटच्या अंगावर वाहन घातले. त्यात महिलेच्या उजव्या पायाला जखम झाली. याबाबत सविता ज्ञानदेव लोणारे (वय 26, रा. कापुरवाडी, ता. नगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी दिग्विजय इंटरप्रायजेस प्रा. लि., नाशिक या कंपनीत महानगरपालिकेच्या पार्किंग व्यवस्थापनासाठी अटेंडंट म्हणून कार्यरत आहेत. रविवारी (दि. 23) दुपारी भिस्तबाग चौक येथे नो पार्किंग झोनमध्ये वाहन (एमएच 17 डीसी 7629) उभे होते.
यावेळी सविता लोणारे यांनी वाहनातील चालकास वाहन हटवण्यास सांगितले. मात्र, वाहन चालकाने वाहन चालू करत असताना वाहनाचे चाक सविता लोणारे यांच्या उजव्या पायावरून घातले, त्यामुळे त्या जखमी झाल्या असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास महिला पोलिस अंमलदार प्रियंका राऊत करत आहेत.