Driver impersonation fraud : ट्रकचालकास पैसे मागणार्या तोतया आरटीओसह एकाला अटक
पाथर्डी : आहिल्यानगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक सुनील मधुकर पाटील (वय 50) यांनी एका बनावट आरटीओ अधिकार्यांविरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ट्रक थांबवून बनावट अधिकारी असल्याचे भासवत चालकाकडून 25 हजार रुपये मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे. दरम्यान, या घटनेतील तोतया अधिकार्यासह दोघांना बीड जिल्ह्यातील एलसीबीच्या पथकाने अटक केली.
तालुक्यातील देवराईजवळ कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर 7 मे रोजी पहाटे 5 वाजता बीडहून अहिल्यानगरकडे जात असलेल्या एमएच 16 एई 1044 क्रमांकाच्या सहाचाकी मालवाहतूक ट्रकला आरटीओचा लोगो आणि स्टिकर लावलेले पांढर्या रंगाची स्कॉर्पिओ (क्रमांक 6404) आडवी लावून थांबविले. ट्रकचालक अशोक नरहरी पांचाळ याला थांबवून गाडीचा फिटनेस संपला असून 64 हजार रुपये दंड बाकी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ट्रक मालक केवल जग्गी यांच्याशी फोनवर चर्चा करून, तोतया अधिकार्याने तडजोडीतून 25 हजार रुपये एका ‘अजय पानवाला’ नावाच्या व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर पाठविण्यास सांगितले.
या प्रकारावर संशय आल्याने मालक केवल जग्गी यांनी मोटारमालक कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष बाबा सानप यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट आरटीओ अधिकारी सूर्यवंशी असे सांगून सरकारी अधिकारी असल्याचे भासवत होते. मात्र, अधिक चौकशीत स्कॉर्पिओ (क्रमांक 6404) ही ठाणे आरटीओ कार्यालयाशी संबंधित असून, ती सद्यस्थितीत ठाण्यातच होती. तसेच ’सूर्यवंशी’ नावाचा कोणताही अधिकारी आरटीओ विभागात कार्यरत नसल्याचे आढळून आले.
त्यामुळे संबंधित व्यक्ती तोतया आरटीओ अधिकारी बनवेगिरी करीत असल्याचे निष्पन्न झाले. सुनील पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या बनावट अधिकार्यांविरोधात फसवणूक आणि सरकारी अधिकारी असल्याचे खोटे भासवणे या गुन्ह्यांतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली.पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

