

नगर: नगर- मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरील विळद बायपास ते सावळीविहीर या 75 किलोमीटरच्या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी खासदार नीलेश लंके यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ केला.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी उपोषणस्थळी येत, पावसामुळे दोन महिने वाट पाहून त्यानंतर काम सुरू करू, त्यामुळे उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु खासदार लंके यांनी काम सुरू झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.(Latest Ahilyanagar News)
खासदार लंके म्हणाले, की, गेल्या सहा वर्षांपासून विळद बायपास ते सावळीविहीर या रस्त्याच्या कामाची प्रतीक्षा आहे. जनतेच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. सन 2018 पासून रखडलेले हे काम आता तिसर्यांदा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. दरवेळी नव्या तारखा, नव्या घोषणा देण्यात येतात. प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही.
जिल्ह्यातील चार आमदार व दोन खासदारांच्या मतदारसंघांतून हा महामार्ग जात आहे. तरीही अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम पूर्ण होत नाही. या कामाची एप्रिल 2025 मध्ये वर्कऑर्डर देण्यात आली आहे. अवकाळी पावसाच्या नावाखाली हे काम टाळले जात आहे, ही जनतेची थट्टा आहे, असा आरोपही त्यांनी केला.
रस्त्याच्या दुरूस्तीच्या नावाखाली काही ठिकाणी थातुरमातूर काम सुरू असून, प्रत्यक्ष मूळ कामाला मुहूर्त कधी मिळणार असा सवाल करत पावसाळयाच्या तोंडावर वर्क ऑर्डर, आणि कामाची पुढची गती अनिश्चित असल्याचे खासदार लंके म्हणाले.
या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, गिरीश जाधव, योगिराज गाडे, अॅड. राहुल झावरे, मनसेचे सचिन डफळ, नलिनी गायकवाड, चंद्रकांत उजागरे, प्रकाश पोटे, गणेशसाठे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकार्यांनी उपोषणस्थळी येऊन खासदार लंके यांची भेट घेतली. दोन महिन्यांनंतर काम सुरू होईल, असे सांगितले. मात्र, खासदार लंके यांनी प्रत्यक्ष काम सुरू करा, तोपर्यंत मी आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली.
मृत्युमुखींची संख्या हजाराहून अधिक
या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झालेल्या अपघातांमध्ये गेल्या चार वर्षांत 388 प्रवाशांना जागीच जीव गमवावा लागला. रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या गृहीत धरली तर ती एक हजाराहून अधिक होते. याचा विचार करून या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करणे गरजेचे असल्याचे खासदार लंके म्हणाले.