

नेवासा : नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शहरात जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. प्रभाग आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार विठ्ठल लंघे गटासाठी हीनिवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.
प्रभाग आरक्षण बाकी असतांनाच शहरातील सर्वच प्रभागांत उमेदवारांची चाचपणी सुरू केल्याचे दिसते. महायुतीकडून आमदार विठ्ठल लंघे हे तुल्यबळ इच्छुकांच्या शोधात आहेत. गेल्या साडेतीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. यावर अखेर न्यायालयाने निर्णय दिल्याने निवडणूकीच्या कामकाजाला वेग आला आहे. सर्वच शासकीय यंत्रणा कामाला लागली असून, शहरातील प्रभाग रचना, मतदारयाद्या, मतदान केंद्र या संदर्भात माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील वातावरण निवडणुकीच्या चर्चेने ढवळून निघत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आगामी नगरपंचायत निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी, महायुती, तसेच इतर राजकीय पक्ष या निवडणुकींना आता कशाप्रकारे सामोरे जातात याकडे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. महायुतीचे विठ्ठल लंघे आमदार झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील ही नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक असल्याने त्याचा कस लागणार आहे. तुल्यबळ उमेदवार द्यावे लागणार आहे. सध्या नेवासा नगरपंचायत माजी मंत्री शंकरराव गडाख गटाच्या ताब्यात आहे.
तालुक्यात गडाख गट व भाजप अशीच वेगवेगळ्या स्थानिक पातळीवरील निवडणुकांत लढती झाल्या आहेत. पंरतु गेल्या विधानसभा निवडणुकीत गडाख व शिवसेना शिंदे गटात लढत झाल्याने शिंदे गट समोर आला आहे. पंरतु शहरात भाजपचा बोलबाला असल्याने शहरात नगरपंचायत निवडणुकीत गडाख गट व महायुती अशाच लढतीचे संकेत आहेत. आ. लंघे यांना सर्वांना बरोबर घेऊनच गडाख गटाचा सामना करावा लागणार आहे. आ. लंघे हे ही निवडणूक कशाप्रकारे हाताळतात याकडे महायुतीचे लक्ष आहे.
नगरपंचायत निवडणुकीसाठी तीन-साडेतीन वर्षांचा मोठा कालावधी गेल्याने अनेकांना आता उमेदवारीचे डोहाळे लागले आहे. यातच नगराध्यक्ष जनतेतून निवडून जाणार असल्याने हे महत्वाचे पद आपल्याकडे असावे यासाठी सर्वच राजकीय पक्ष कंबर कसणार आहेत.