

नेवासा : नेवासा-शेवगाव महामार्गावरील नागापूर फाटा- खुणेगाव (ता. नेवासा) येथील प्रादेशिक वन विभागाच्या वनीकरणाला रविवारी (दि. 16) दुपारी आग लागून सुमारे दहा हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील वृक्ष जळाली, तर काही होरपळली आहेत. दरम्यान, या आगीचे नक्की कारण समजले नसले, तरी या परिसरात मद्यपींच्या वाढत्या ओल्या पार्ट्या व गांजा नशेबाजांच्या सातत्याने रंगणार्या बैठका, तसेच अनेकजण या वनीकरणाचे डम्पिंग ग्राउंड म्हणून उपयोग करून टाकलेल्या कचरा विल्हेवाट लावण्यासाठी पेटवून दिला जातो हेच आगीचे कारण असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
दरम्यान, वनीकरण विभागाच्या अधिकार्यांचा वनीकरणाकडे दुर्लक्षच आगीसारख्या प्रकाराला कारणीभूत असल्याचे नागरिक सांगतात. वनीकरणामध्ये कोण येतोय व कोण काय करतोय या गोष्टीकडे वनीकरण विभागाच्या अधिकार्यांचे गांभीर्याने लक्ष नसल्याने जनतेत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
भानसहिवरे- सौंदाळा- खुणेगाव नागापूर शिवारालगत असलेले खुुणेगाव शिवारातील वनराईत गेल्या काही वर्षांपासून या परिसरात अज्ञात व्यक्तींकडून रात्रीच्या सुमारास हॉटेलचा कचरा, कागद, कागदाचे पुठ्ठे, प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक व काचेच्या बाटल्या, लहान फरशीचे तुकडे, जुने कपडे, काचांचे तुकडे, आदी टाकाऊ वस्तूंसह मृत कोंबड्या, जनावरे मोठ्या प्रमाणावर टाकले जात असल्याने येथे कचर्याच्या घाणीसह दुर्गंधीचे साम्राज्य पसरत असल्याने नेवासा- शेवगाव महामार्गावरील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
या वन व परिसरात मुबलक गवत व पाला असल्याने येथे स्थानिक पाळीवसह वन्यप्राणी चराईसाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. दरम्यान, येथे टाकण्यात येणार्या हॉटेलच्या कचर्यात प्लॅस्टिक पिशव्यांत खाद्यपदार्थ असल्याने जनावरांच्या तो प्लास्टिक पिशव्यासह खाण्यात येतो. त्यामुळे जनावरांच्या आरोग्यासही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरात अज्ञातांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. त्यामुळे या परिसरास बकालपणा येऊन सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस या ठिकाणी कचर्यांचे ढीग वाढतच असल्याने घनदाट वनराई नटलेल्या या जंगलाची आता ‘डम्पिंग ग्राऊंड’ म्हणून ओळख होत आहे.
महामार्गावर असलेले खुणेगाव वनीकरण अनेक वर्षांपासून मद्यपींचा अड्डा बनले आहे. हा परिसर दिवसा व रात्रीच्या ओल्या पार्ट्यांनी गजबजून जात असल्याचे निदर्शनास येते. उन्हाचा पारा वाढल्याने येथील दाट असलेले गवत वाळून गेल्याने मद्यपी याच ठिकाणी मद्याचा आनंद लुटत सिगारेट- बिड्यांच्या झुरक्यांचं आनंद घेत असतात. त्यातूनच ही आग लागल्याचे बोलले जाते.
आगीचे अद्याप कारण समजले नसून याबाबत वरिष्ठ चौकशी करणार असून, आग तातडीने विझविल्याने मोठे नुकसान टळले आहे.
दामोदर धुळे, वनरक्षक, नेवासा