

माझी बहीण आ. मोनिका राजळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन माजी खासदार तथा शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या भाजपाच्या निवडणूक समन्वयक डॉ. प्रीतम मुंडे यांनी केले.
महायुतीच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मुंडे यांची रॅली काढण्यात आली. या वेळी अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, दिनेश अल्हाट, बापूसाहेब पाटेकर, नंदकुमार शेळके, धनंजय बडे, अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, भगवान आव्हाड, अशोक चोरमले, भगवान बांगर, नारायण पालवे, बाबा राजगुरू, अंकुश कासोळे, वामन कीर्तने आदी उपस्थित होते.
मुंडे म्हणाल्या की, आज फक्त पदाधिकार्यांची बैठक होती, परंतु मुंडे नावाची जादू पुन्हा पाहायला मिळाली. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर घेऊन जायची आहे. लोकसभेला विकासाचा मुद्दा बाजूला राहिल्यामुळे मोठे नुकसान झाले. विधानसभेला त्यात आपल्याला सुधारणा करून आ. राजळेंना निवडून आणायचे असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
प्रत्येक निवडणुकीत काहीतरी वेगळे पिल्लू सोशल मीडियातून विरोधकांकडून काढले जातात. त्यामुळे वातावरण दूषित होते. अफवांवर विश्वास ठेवू नका, कोण काय करतं याकडे लक्ष देण्यापेक्षा सरकारने केलेली कामे लोकांसमोर ठेवा, असे मुंडे म्हणाल्या.
गोपीनाथ मुंडेंची लेक हेच मोठं पद
लोकसभा लढवली नाही,तेव्हा मला पाथर्डी-शेवगाव विधानसभेची ऑफर आली होती. माझ्यासाठी दररोज एक-एक मतदारसंघ तयार होत होता. पण, मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेवून राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही. मी प्रीतम गोपीनाथ मुंडे आहे. मुंडे साहेबांनी अनेक संघर्ष पाहिले असल्याने माझ्या वाट्यालाही थोडासा संघर्ष येणारच ना? गोपीनाथ मुंडे यांची लेक हेच पद माझ्यासाठी सर्वात मोठं आहे, असेही प्रितम यांनी म्हटलं.