Nagar Assembly Election: नगर शहरात विश्वास जुना... संग्रामच पुन्हा!

आमदार संग्राम जगताप हे राज्यातील एकमेव उदाहरण असावे, की त्यांच्या प्रचारासाठी एकही स्टार प्रचारक आला नाही...
Nagar Assembly Election
नगर शहरात विश्वास जुना... संग्रामच पुन्हा! Pudhari
Published on
Updated on

आमदार संग्राम जगताप यांनी महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप व शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोट बांधण्यात यश मिळविले. विविध समाजबांधवांचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाले. आमदार संग्राम जगताप हे राज्यातील एकमेव उदाहरण असावे, की त्यांच्या प्रचारासाठी एकही स्टार प्रचारक आला नाही...

विद्यमान आमदार संग्राम जगताप गेल्या वर्षापासून विधानसभा निवडणुकीची तयारी करीत होते. शहर मतदारसंघातील प्रत्येक कॉलनी, उपनगरासह विभागात त्यांचा थेट संवाद आहे. शहरातील प्रत्येक भागात त्यांनी कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण केलेली आहे. रस्ते, ड्रेनेज लाईन, पथदिवे यासाठी स्वतःच पुढाकार घेतल्याने त्यांचे नेटवर्क स्ट्राँग झाले. प्रचारातही त्यांनी आघाडीच घेतली होती. विश्वासू शिलेदार आणि मतदारांशी वन टू वन संवाद हेच संग्राम जगताप यांच्या यशाचे गमक म्हणावे लागेल. सलग तिसर्‍यांदा विजय मिळवून आमदार संग्राम जगताप यांनी ‘विश्वास जुना संग्राम जगताप पुन्हा’ ही त्यांची टॅगलाईन सार्थक ठरविली.

Nagar Assembly Election
Ahilyanagar: जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात गेल्या 30 ते 35 वर्षांनंतर शिवसेनेचा धनुष्यबाण दिसला नाही. राज्यात महाविकास आघाडी करून काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेना (उबाठा) यांनी निवडणूक लढविली. त्यात गेल्या 35 वर्षांपासून नगर शहर मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला होता. पण, यंदाच्या निवडणुकीत वरिष्ठ पातळीवर मोठे राजकारण झाल्याने नगर शहर मतदारसंघ शिवसेनेऐवजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सुटला.

त्यात उमेदवार आणि जागावाटपाचा घोळ विरोधी उमेदवार संग्राम जगताप यांच्या पथ्यावर पडला. आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या वर्षापासून निवडणुकीची तयारी सुरू केली होती. तर, दुसर्‍या बाजूला उमेदवारीच फायनल होत नसल्याने सगळा घोळ सुरू होता. त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांना जनसंपर्क करण्यास भरपूर वेळ मिळाला. त्यामुळे त्यांचा प्रचाराचा रथ विरोधकांपासून कोसो पुढे गेला.

दरम्यान, विरोधी उमेदवार अभिषेक कळमकर यांचा एकखांबी तंबू हतबल होताना दिसला. त्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांची अपक्ष उमेदवारी डोकेदुखी ठरली. शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक यांची समजूत काढून वरिष्ठ पातळीवर हालचाली करून गाडे यांचा पाठिंबा मिळविण्यात कळमकर यांना यश मिळाले. मात्र, तो एकीचा टेम्पो प्रचारात काहीसा कमी पडला. खासदार नीलेश लंके यांनी प्रचारात सहभागी होऊन वातावरण निर्मिती केली. मात्र तीही तोकडी पडली. खासदार अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांच्या सभा झाल्या; पण त्या तितक्या प्रभावी ठरल्या नाहीत.

Nagar Assembly Election
Pimpri Elections Result: पिंपरी-चिंचवड अन् मावळात महाआघाडीचे पानिपत!

दुसरीकडे आमदार संग्राम जगताप यांनी महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप व शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोट बांधण्यात यश मिळविले. विविध समाजबांधवांचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाले. आमदार संग्राम जगताप हे राज्यातील एकमेव उदाहरण असावे, की त्यांच्या प्रचारासाठी एकही स्टार प्रचारक आला नाही अथवा तशी गरज नसावी असे महायुतीला कळविले असावे.

आमदार संग्राम जगताप यांना बोल्हेगाव, नागापूर भागात माजी नगरसेवक कुमार वाकळे, दत्ता सप्रे, राजेश कातोरे यांनी चांगले बळ दिले. सावेडी उपनगरात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी आधीच अभेद्य असलेल्या किल्ल्याच्या तटबंदी मजबूत केल्या. निर्मलनगर, पाईपलाईन रस्ता परिसरातून निखील वारे, विनीत पाऊलबुद्धे, सुनील त्रिंबके यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी ग्राउंड उतरून प्रचार केला. त्याचा परिपाक मत मोजणीत आमदार जगताप यांना लीड मिळाली.

सावेडी गाव परिसरातून भाजपचे माजी महापौर बाबासाहेब वाकळे, रवींद्र बारस्कर, महेंद्र गंधे यांनी ताकद लावली. नालेगाव व मध्य शहरातही आमदार संग्राम जगताप यांना चांगले मतदान मिळाले. शिवेसना उबाठा पक्षाचे स्थायी समितीचे माजी सभापती कवडे यांनी थेट आमदार जगताप यांचा पाठिंबा देऊन महाविकास आघाडीची हवाच काढून घेतली. त्यामुळे नालेगाव, कल्याण रोड, दिल्ली गेट परिसरात आमदार संग्राम जगताप यांना चांगला फायदा झाला.

सारसनगर, बुरूडगाव, विनायकनगर हा आमदार संग्राम जगताप यांचा बालेकिल्ला आहे. तिथे चारही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यात माजी महापौर गणेश भोसले, प्रकाश भागानगरे यांची किल्ला लढविला. आमदार जगताप यांचा मतदान खेचून आणण्यात यश मिळाले.

दरम्यान, केडगावमध्ये कोतकर यांनी आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना पाठिंबा दिल्याची चर्चा होती. मात्र, तिथेही काही विश्वासू शिलेदाराच्या मदतीने संग्राम जगताप यांनी मतदान खेचून आणले.

ते नुसतेच नावाला शिवसेनेत

शिवसेना उबाठा गटाचे काही नगरसेवक महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांच्या प्रचारात सक्रिय झाले नाहीत. ते नुसतेच महाविकास आघाडीत होते. मात्र, त्यांची यंत्रणा आमदार जगताप यांच्यासाठी राबताना दिसत होती. जगताप यांचे सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांशी असलेले सलोख्याचे संबंध कामी आल्याची चर्चा त्यामुळेच शहरात आहे.

केंद्रिभूत प्रचार जगतापांच्या पथ्यावर

विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात धर्माच्या नावावर धार्मिक केंद्रिभूत प्रचार झाला. आज झालेल्या मत मोजणीतून ते स्पष्ट झाले. मुस्लिम बहुल भागात अभिषेक कळमकर यांना चांगलेच मताधिक्क्य मिळाले. तर, तिथे आमदार संग्राम जगताप अवघे दोन आकडी मतात राहिले. दुसरीकडे हिंदू बहुल भागात आमदार संग्राम जगताप यांना चांगल्या मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात झालेला धार्मिक केंद्रिभूत प्रचार आमदार संग्राम जगताप यांच्या पथ्यावर पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news