आमदार संग्राम जगताप ‘नगररचना’वर संतापले

पारदर्शकतेसाठी अधिकारी-कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्याच्या सूचना
Ahilyanagar News
आमदार संग्राम जगताप ‘नगररचना’वर संतापले Pudhari
Published on
Updated on

नगर: अहिल्यानगर महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अनागाेंदी कारभाराबद्दल आमदार जगताप यांनी संताप व्यक्त करीत अधिकारी चांगलेच झापले. नगररचनाच्या पारदर्शक कामासाठी विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या तत्काळ बदल्या करा, प्रलंबित सर्व प्रकरणे तातडीने मंजूर करा, विभागाचा मनमानी, हुकुमशाही व अनागोंदी कारभार सुधारण्यासाठी आयुक्तांनी तातडीने कठोर पावले उचलावीत, अशा सूचना आ. संग्राम जगताप यांनी केल्या. रचनाच्या तक्रारीबाबत अधिकार्‍यांसह आयुक्तांनाही चांगलेच धारेवर धरत जाब विचारला.

महापालिकेच्या नगररचना विभागाच्या वाढत्या तक्रारींबाबत आमदार संग्राम जगताप यांनी 20 मार्चला थेट विधीमंडळात लक्षवेधी सूचना मांडत कारभार सुधारण्यासाठी सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आ. जगताप यांनी बुधवारी (दि. 26) अहिल्यानगरच्या शासकीय विश्रामगृहावर आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह नगररचना विभागातील सर्व अधिकारी, क्रेडाई संघटना, इंजिनियर आर्किटेक्ट असोसिएशन व बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांची संयुक्त बैठक घेतली.

तिथे त्यांनी नगररचना विभागाचे वाभाडे काढले. यावेळी क्रेडाई संघटनेचे राज्य सचिव आशिष पोखारणा, अहिल्यानगरचे अध्यक्ष अमित मुथा, सचिव प्रसाद आंधळे, आर्किटेक्ट इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष आदिनाथ दहिफळे, समिती प्रमुख रत्नाकर कुलकर्णी, माजी अध्यक्ष अनिल मुरकुटे, उपाध्यक्ष विनोद काकडे, माजी उपमहापौर गणेश भोसले व उद्योजक राजेश भंडारी आदींसह बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते. या बैठकीत सर्व संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी व बांधकाम व्यवसायिकांनी नगररचना विभागाकडून कामकाजात कशा पद्धतीने अडवणूक होते याचा पाढाच वाचला.

आ. जगताप म्हणाले, आयुक्त यशवंत डांगे महारपालिकेचे पालक आहेत. त्यामुळे नगररचना विभागाचा व एकंदरीत मनापाचा कारभार सुधारण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. अधिकाराचा वापर करून त्यांनी तत्काळ उपाययोजना कराव्यात. शासनाकडे तक्रार व चौकशी करण्याची वेळ आणू नका. तुम्हाला त्रास देण्याची आमची भूमिका नसून शहरात प्रलंबित कामे मार्गी लागून शहराचे चांगले व्हावे यासाठीच तळमळ आहे.

माजी महापौर गणेश भोसले म्हणाले, आ. जगताप सरकारशी भांडून कोट्यवधींचा निधी आणत आहेत. शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाकडे नगररचना विभागातील अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. सर्व अधिकारी ऑफिसमध्ये बसून असून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी एकही अधिकारी येत नाही. हस्ते परहस्ते काम करण्यावर यांचा भर आहे.

आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, आ. जगताप यांनी केलेल्या सूचनेनुसार महापालिकेच्या नगररचना विभागाच्या कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवून काही अधिकार्‍यांची बदली करणार आहे. विभागातील मनुष्यबळ वाढवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. तसेच आलेले नवे व प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर मंजूर करून या बैठकीत ज्या मागण्या व तक्रारी झाल्या आहेत. त्यावर येत्या 10 दिवसांत मार्ग काढू, असे आश्वासन दिले.

....तर मनपाला मिळेल तब्बल 142 कोटींचा महसूल

बैठकीत आर्किटेक इंजिनिअर असोसिएशनचे रत्नाकर कुलकर्णी म्हणाले, नगररचना विभागात आर्थिक व इतर कारणांनी शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत. जर या प्रकरणांना मंजुरी दिली तर मनपाला तब्बल 142 कोटींचा महसूल मिळू शकतो. एकीकडे मनपाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे वारंवार सांगण्यात येते. दुसरीकडे मनपा एव्हढ्या मोठ्या महसूल उत्पन्नाकडे दुर्लक्ष करीत उदासीन भूमिका घेत असल्याचा विरोधाभास कुलकर्णी यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या निदर्शनास आणला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news