

जामखेड: राजकारणाची पातळी इतक्या खालच्या पातळीवर गेली आहे की, सर्वसामान्यांना या राज्यकर्त्यांचा तिरस्कार वाटायला लागला आहे. राज्यकर्त्यांना सर्वसामान्य जनतेचा विसर पडल्याची खंत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.
नगर जिल्हा सहकारी बँकेच्या जामखेड येथील लोकनेते जगन्नाथ राळेभात पाटील सभागृहात आमदार पवार यांची विविध पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.याप्रसंगी ते बोलत होते. (Latest Ahilyanagar News)
आमदार पवार म्हणाले, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, तसेच पुढील 4 वर्षात होणार्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील असा विश्वास दिला. त्याचप्रमाणे जिल्हा सहकारी बँकेमध्ये व बाजार समिती मध्ये अमोल राळेभात व सुधीर राळेभात हे दोन्ही बंधू अत्यंत चांगले काम करत असल्याचे मत व्यक्त केले.
जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात म्हणाले, आमदार पवार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचे काम करीत आहेत. याशिवाय विधानसभेमध्ये सर्व सामान्यांचे प्रश्न अत्यंत ठामपणे व निर्भिडपणे मांडत आहेत. विरोधी पक्षनेत्याची भूमिका मांडताना महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांची मांडणी करून सामान्य शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.