

बोधेगाव: शेवगाव शहरात ग्रामीण भागातील 17 वर्षांची युवती क्लाससाठी आली असताना एका मैत्रिणीला सोडविण्यासाठी जात असताना दोन तरुणांनी त्यांची दुचाकी अडवून चाकूने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडल्याने शेवगावात एकच खळबळ उडाली.
याबाबत पोलिस सूत्राकडून समजलेली माहिती अशी, की पीडित ग्रामीण भागातून 17 वर्षांची युवती ब्यूटीपार्लरच्या क्लाससाठी शेवगाव शहरात आली होती. क्लासनंतर तिच्या मैत्रिणीला दुचाकीवरून घरी सोडण्यासाठी जात होती. (Latest Ahilyanagar News)
या मुलीने पांढरा शर्ट व काळी जिन्स आणि तिच्या मैत्रिणीने काळ्या रंगाचा बुरखा परिधान केला होता. दुचाकी कुंभारगल्लीतून पुढे जात असताना मोटरसायकलवरून आलेले आरोपी सलाउद्दिन हाशमोदिन शेख (रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव), गुलाम गौषकुरेशी (रा खाटीक गल्ली, शेवगाव) यांनी त्यांना अडविले.
यातील काळा बुरखा घालून जाणार्या तरुणीला कोणी मुलगा घेऊन जात असल्याचे समजून आरोपींनी पांढरा शर्ट घातलेल्या तरुणीचा हात पकडून एकाने तिच्या गळ्यावर चाकूने वार केला. मुलीने दुसरा हात मध्ये घातल्याने चाकूचा वार तिच्या दंडावर लागला. नंतर आरोपी पसार झाले.
याबाबत रात्री उशिरा शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी सलाउद्दिन शेख शेवगावातील भारदे हायस्कल परिसरात लपल्याचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना समजले. त्यांनी पथक पाठविले, तेव्हा पळून जात असताना त्याला पकडण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुदंरड तपास करत आहेत.