Maharashtra Kesari 2025
स्पर्धा जिंकली, कुस्ती हरली!Pudhari

स्पर्धा जिंकली, कुस्ती हरली! महाराष्ट्र केसरी स्पर्धेत नेमकं काय घडलं?

Maharashtra Kesari 2025 | कै. बलभीमअण्णा जगताप क्रीडा नगरी
Published on

संदीप रोडे

नगर: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या रविवारी अहिल्यानगरमध्ये झालेल्या लढतीत स्पर्धेत विजेता घोषित करण्यात आला खरा, पण पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेत पराभूतांनी गोंधळ घातला. गादी विभागातील अंतिम लढतीत पंचांच्या निर्णयानंतर पराभूत झालेला शिवराज राक्षे आणि महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम सामन्यात पंचाच्या निर्णयाने पराभूत झालेला महेंद्र गायकवाड याने थेट पंचांना ‘लक्ष्य’ केले. त्यावरून प्रचंड गदारोळ झाला.

पोलिसांनी हस्तक्षेप करत वादावर पडदा टाकला. या गदारोळातच उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आ. संग्राम जगताप, आ. काशिनाथ दाते यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा तसेच थार जीप महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज मोहोळ याला भेट देण्यात आली.

दरम्यान, परभणीचा साकेत यादव आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात माती विभागाचा अंतिम सामना झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री विखे, मंत्री दत्तात्रय भरणे, सभापती शिंदे यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली. यात महेंद्र गायकवाड याने साकेत यादवला चितपट करीत बाजी मारली अन् तो माती विभागातून महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत पोहोचला.

गादी गटातील अंतिम लढत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि नांदेडचा शिवराज राक्षेत यांच्यात झाली. अवघ्या दोन मिनिटांत मोहोळने राक्षेवर पकड घेत त्याला चितपट केले. पण, पंचांच्या निर्णयाला राक्षेने आक्षेप घेतला. चितपट कुस्ती झालीच नाही, कुस्तीचा रिप्ले पाहून निर्णय द्यावा, असे त्याचे म्हणणे होते. त्यासाठी तो केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडेही दाद मागण्यास गेला.

मात्र, पंचांचा निर्णय कायम ठेवत राक्षेला पराभूत घोषित करण्यात आले. याबाबत त्याने थेट पंचांकडे धाव घेत विचारणा केली. मात्र, संतप्त राक्षेचा तोल ढासळला अन् त्याने पोलिसांसमक्ष पंचांची गचांडी पकडून लाथ मारली. त्यानंतर गोंधळ सुरू झाला. मात्र, पोलिसांनी त्यावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले. या गोंधळात बराच वेळ गेला. त्यामुळे अंतिम सामना दीड तासाच्या विलंबाने सुरू झाला.

पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्या महाराष्ट्र केसरीसाठी अंतिम लढत सुरू झाली. पहिल्या दोन मिनिटांत दोघांनाही गुण मिळवता आला नाही. दोघांनाही निष्क्रियतेचा एक-एक गुण मिळाला. शेवटचे चाळीस सेकंदाचा खेळ बाकी असताना पृथ्वीराज आक्रमक झाला. त्याने डाव टाकण्याचा प्रयत्न केला. तो परतवून लावत असताना महेंद्र बाहेर गेला. त्यात पंचाने मोहोळला दोन गुण दिले.

मात्र, मी आखाड्याबाहेर जाण्यापूर्वी मोहोळचा पाय गेला होता, असा दावा करीत पंचाच्या गुणावर गायकवाडने आक्षेप घेतला. तसेच, माझा कॉस्च्यूम फाडला असाही आक्षेप घेतला, मात्र, तो पंचांनी तो अमान्य केला. त्यामुळे गायकवाड याने शेवटचे 20 सेकंद बाकी असताना आखाडा सोडला. त्यामुळे 3-1 अशा तांत्रिक गुणांच्या आधारे पृथ्वीराज मोहोळ याला पंचांनी विजयी घोषित केले.

आखाड्याबाहेर पडलेला महेंद्र काही वेळात पुन्हा पंचांकडे आला. त्यानेही पंचांना मारहाण केली. गायकवाडसोबत त्याचे समर्थकही होते. प्रचंड गोंधळावेळी पोलिसही तेथे पोहोचले. गायकवाड आक्रमक झाल्याने पंचांचीदेखील पळापळ झाली. पोलिसांनी लाठीचार्ज करून गर्दी पांगविली, तर महेंद्र गायकवाड याला तेथून बाहेर काढले.

गादी गटातील अंतिम लढत आणि महाराष्ट्र केसरीच्या लढतीत पंचांनी दिलेल्या निर्णयावर पैलवानांनी आक्षेप घेतला. रिप्ले पाहून निर्णय द्यावा, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, त्यांना रिप्ले न दाखवता त्यांचा आक्षेप फेटाळून लावला गेला. त्यामुळे कुस्तीला वादाचे गालबोट लागले.

अहिल्यानगरीत रंगलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरी जिंकलेले मोहोळ आणि गायकवाड दोघेही केसरीसाठी भिडले. पण तेथेही गालबोट लागलेच. नियमानुसार पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ जिंकला, असे पंचांनी घोषित केल्याने स्पर्धा जिंकली. पण, आक्षेपांचे निरसन करण्यात पंच कमी पडल्याचे दिसले. परिणामी ‘स्पर्धा जिंकली; पण कुस्ती हरली’ असेच चित्र क्रीडानगरीत दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news