ज्येष्ठ नेते शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) ः माझे जुने सहकारी मधुकर पिचड यांची दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली. आपल्या राजकीय कारकीर्दीत आदिवासी समाजाचे स्थान आणि आवाज बळकट करण्यात त्यांची मोलाची साथ लाभली. त्यांची ही कारकीर्द नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त करतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
नितीन गडकरी (केंद्रीय वाहतूक मंत्री) : ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. विधिमंडळात अनेक वर्षे आम्ही सोबत काम केले. अतिशय नम्र, अभ्यासू आणि महाराष्ट्राच्या विकासाची तळमळ असलेला नेता म्हणून पिचड कायम स्मरणात राहतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा आणि कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून सुरुवात करत प्रदीर्घ काळ त्यांनी राज्य विधिमंडळात प्रतिनिधित्त्व केले. विरोधी पक्षनेते, मंत्री अशा विविध जबाबदार्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. अगणित लोकांचे आयुष्य त्यांच्यामुळे उजळले. आदिवासींच्या प्रश्नांसाठी सातत्याने ते आग्रही असायचे. आर्थिक मागासांसाठी त्यांनी शिक्षणाच्या मोठ्या सुविधा उभारल्या. आदिवासींमध्ये उच्चशिक्षणाची पायाभरणी त्यांनी केली. जलसिंचनासोबतच सहकार क्षेत्रातही त्यांनी छाप उमटवली.
उपमुख्यमंत्री अजित पवार : ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाने, आदिवासी बांधवांच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यरत, महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारणातील मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. पिचड यांनी आदिवासी बांधवांच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात मोठें योगदान दिले. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे. पक्षासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्यासारख्या नेतृत्वाची उणीव कायम जाणवेल.
बाळासाहेब थोरात (सदस्य, काँग्रेस राष्ट्रीय वर्किंग कमिटी) |: समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत झटणारे व्यक्तिमत्व हरपले. अकोल्यासारख्या आदिवासी व दुर्गम भागातून जीवनाचा प्रवास सुरू करणारे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी राज्यात विविध खात्यांचे मंत्रिपद भूषवताना अत्यंत कार्यक्षमपणे काम केले. राज्यभरातील आदिवासींच्या विकासासाठी मोठे काम करताना तालुक्याचा सर्वांगीण विकास त्यांनी केला. निळवंडे धरणाच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणार्या या ज्येष्ठ नेतृत्वाच्या निधनाने समाजाच्या विकासासाठी सतत लढणारे मोठे व्यक्तिमत्व हरपले आहे. महाराष्ट्राने एक मोठा नेता गमावला आहे.
माजी आमदार डॉ सुधीर तांबे : सहकारातून जिल्ह्याच्या विकासाची पायाभरणी झाली असून जुन्या पिढीतून नव्या पिढीकडे हा विकासाचा विचार नेण्यात मधुकरराव पिचड यांचे मोलाचे योगदान राहिले. विविध खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. संघर्षशील जीवन व पुरोगामी विचार हे पिचड यांचे वैशिष्ट्य राहिले. पिचड यांच्या निधनाने जिल्ह्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक हरपले आहे.
आ. विठ्ठलराव लंघे : माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यासोबत काम करण्याची संधी मागील काळात मिळाली, हे माझे भाग्य आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे काम त्यांनी केले. जमिनीवर राहून काम करण्याची भूमिका ज्येष्ठ नेते पिचड यांनी घडवली. जिल्ह्यातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले आहे. -