

नगर: शिर्डी येथे गावठी पिस्तूल बाळगणार्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस व मोबाईल असा 70 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अमोल दिवे (वय 24, रा. गोवर्धननगर, शिर्डी, ता.राहाता, जि. अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे.
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्रे बाळगणार्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिल्या. त्यानुसार आहेर यांनी उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस अंमलदार मनोहर गोसावी, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब गुंजाळ, प्रमोद जाधव, अमृत आढाव, प्रशांत राठोड, रमीजराजा आत्तार व महादेव भांड यांचे पथक तयार करून शोधाकामी रवाना केले.
पोलिस तपास पथक 14 फेबु्रवारी 2025 रोजी शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अग्निशस्त्र, हत्यारे बाळगणार्यांची माहिती काढत होते. त्यावेळी सराईत गुन्हेगार अमोल दिवे हा गावठी कट्टा विक्री करण्याचे उद्देशाने हॉटेल राजेजवळ, कनकुरी रोड, नांदुर्खी रोड येथे थांबलेला असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून 50 हजारांचे गावठी पिस्तूल, दीड हजारांचे जिवंत काडतूस व वीस हजारांचा मोबाईल असा 71 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याकडे पिस्तुलाबाबत चौकशी केली असता वरील पिस्तुल मुजम्मिल हारून बागवान (रा. श्रीरामपूर)(फरार) याच्याकडून खरेदी करून विक्री करता आणल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.