

नगर तालुका : नगर तालुक्यातील जेऊर येथील अतिक्रमणांचा विषय चांगलाच गाजत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ससेवाडी रस्त्यालगतच्या अतिक्रमण धारकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. सीना नदी पात्रातील अतिक्रमणे हटविण्यात येणार की नाही, याबाबत ग्रामस्थ, तसेच व्यावसायिकांच्या मनात देखील संभ्रमावस्था होती. परंतु तहसील कार्यालयाच्या वतीने कुकडी पाटबंधारेचे कार्यकारी अभियंत्यांनी सीना नदी पात्रातील अतिक्रमणे हटविण्याबाबत नोटिसा देण्यात आल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून समजली. त्यामुळे लवकरच जेऊर येथील सीना नदीपात्रातील अतिक्रमणावर हातोडा पडणार असून, नदीपात्र मोकळा श्वास घेणार असल्याचे समजते.
जेऊर गावची मुख्य बाजारपेठ अतिक्रमणांत वसलेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या बाजारपेठेतील व्यावसायिकांना अतिक्रमण हटविण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामपंचायत कार्यालयालाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नोटिसा देऊन ग्रामपंचायतीच्या वतीने अतिक्रमणे हटविण्याबाबत कळविले होते. त्यानुसार अनेक व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणे हटविली आहेत.
परंतु अद्याप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण राहिलेले आहे. लवकरच सार्वजनिक बांधकाम विभाग पोलिस बंदोबस्तात छत्रपती संभाजी नगर महामार्ग ते ससेवाडी रस्त्यालगतची अतिक्रमण हटाव मोहीम राबविणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सात दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. त्याला आता महिना होत आला आहे. त्यामुळे ससेवाडी रस्त्यालगत लवकरच अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत कार्यालयाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नोटिसा मिळताच ग्रामपंचायतीच्या वतीने ससेवाडी रस्त्यालगत तसेच सीना नदीपात्र ते बायजामाता मंदिर रस्त्यालगत असणार्या सुमारे 100 हून अधिक अतिक्रमणधारकांना नािेटसा देण्यात आल्या होत्या. परंतु अनेक व्यावसायिक तसेच नागरिकांनी नोटिसांना केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम शासकीय यंत्रणेद्वारे राबविण्यात येण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झालेल्या आहेत.
जेऊरला अतिक्रमणाचा विळखा पडला असून, अतिक्रमणे हटविण्याबाबत वीस वर्षांपासून चर्चा सुरू होत्या. परंतु कारवाई होत नव्हती. शासकीय निर्णयानुसार सर्वत्र अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाल्याने जेऊर गावात देखील असणारे अतिक्रमण हटविण्यात येत आहे. जेऊर बाजारपेठ, बायजामाता मंदिर परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर, गावातील अंतर्गत रस्ते, वाघवाडी गावठाण, विविध ठिकाणच्या शासकीय जागा अतिक्रमणांच्या विळख्यात आहेत.
सीना नदीपात्रात मोठ्या संख्येने अतिक्रमणे झाल्याने ससेवाडी रस्त्यावर वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे ससेवाडी ग्रामस्थही अतिक्रमण हटविण्याबाबत आक्रमक झाले आहेत. जेऊर येथील सीना नदीपात्रातील अतिक्रमणे हटविण्याबाबत तहसील कार्यालयाच्या वतीने कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक दोन श्रीगोंदा येथील कार्यकारी अभियंता यांना नोटीस देण्यात आली आहे.
कुकडी पाटबंधारेकडून लवकरच सीना नदीपात्रातील अतिक्रमणधारकांना नोटिसा देऊन अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. सीना नदीपात्र हे कुकडी पाटबंधारे विभाग श्रीगोंदा यांच्या अंतर्गत येत असल्याने त्यांना नोटीस देण्यात आली आहे. कुकडी पाटबंधारे विभागाच्या वतीने कारवाई झाल्यानंतर सीना नदीपात्र मोकळा श्वास घेणार आहे.