

नगर: जिल्ह्यात तुटीचा पाऊस असला तरी खरीप पेरणी सुरूच आहे. आतापर्यंत 5 लाख 42 हजार 421 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. खरीप हंगामासाठी निश्चित केलेल्या क्षेत्राच्या तुलनेत 75.74 टक्के पेरा झाला आहे. राहाता तालुक्यात शंभर टक्के तर राहुरी तालुक्यात सर्वात कमी पन्नास टक्के पेरणी झाली आहे. पेरणी झालेली पिके उगवली असून रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. मात्र, पावसाअभावी पिकांचे बाळसे गेले आहे. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे.
यंदाचा मे महिना उन्हाच्या काहिलीचा नव्हे तर दमदार पावसाचा होता. या महिन्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. सरासरी 220 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे शेतीची मशागत रखडली होती. जून महिन्यात दमदार पाऊस होईल अशी अपेक्षा होती. परंतु मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. हा पाऊस देखील 20 टक्के तुटीचा झाला. अनेक ठिकाणी पेरणीजोगा पाऊस झाला नाही. अशा परिस्थितीत देखील शेतकर्यांनी पेरणीस प्रारंभ केला. (Latest Ahilyanagar News)
कृषी विभागाने खरीप पेरणीसाठी 7 लाख 16 हजार 209 हेक्टर क्षेत्र निश्चित केले. कृषी विभागाच्या अहवालानुसार 4 जुलै रोजी जिल्ह्यात 5 लाख 42 हजार 421 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वीस दिवसांत 2 लाख 45 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली.
जिल्ह्यात 5 जुलैअखेरपर्यंत 123.9 मि.मी. पाऊस अपेक्षित असताना फक्त 84.7 मिलिमीटर पाऊस झाला आहे. जवळपास 31 टक्के पावसाची तूट आहे. गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारली आहे. पावसाअभावी अद्याप 24 टक्के खरीप क्षेत्र पेरणीअभावी पडीक आहे. जून महिन्याच्या पहिल्या आणि दुसर्या आठवड्यात पेरणी झालेल्या पिकांची उगवण झाली. काही ठिकाणी पिकांची रोपे वाढीस लागली आहेत. या रोपांना पावसाची आवश्यकता आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे रोपे कोमजू लागले आहेत.
सध्या विहिरींना पाणी आहे. या पाण्याचा वापर केल्यास आठ तासांत अर्धा एकर देखील ओले होत नाही अशी परिस्थिती आहे. बाजरी, सोयाबीन, मुग, उडीद, कापूस आदी पिकांच्या रोपांना पावसाच्या पाण्याची गरज आहे. दोन चार दिवसांत पाऊस झाला तरच रोपांना जीवदान मिळण्याची शक्यता आहे. अन्यथा खरीप हंगामच धोक्यात आला आहे.
शेवगावात कापूस तर राहाता तालुक्यात सोयाबीन
कापसाची सर्वाधिक पेरणी 41 हजार 458 हेक्टर शेवगाव तालुक्यात झाली. नेवाशात 25 हजार 487, पाथर्डी तालुक्यात 22 हजार 287 हेक्टर पेरा आहे. सोयाबीनची सर्वाधिक पेरणी राहाता तालुक्यात 24 हजार 821 हेक्टर झाली. त्यानंतर जामखेड तालुक्यात 19 हजार 976, अकोले तालुक्यात 17 हजार 501, कोपरगाव तालुक्यात 14 हजार 643 हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. पारनेर तालुक्यात बाजरीचे सर्वाधिक 11 हजार 673 हेक्टर क्षेत्रावर तर मकाची पेरणी कर्जत तालुक्यात सर्वाधिक 16 हजार 647 हेक्टरवर झाली आहे.