Kharif Crop Damage: पाथर्डी तालुका दुष्काळाच्या छायेत... पावसाने दडी मारल्याने खरीप पिके गेली

पंचनामे करून आर्थिक मदत द्या; टँकरची मागणी
Kharif Crop Damage
Kharif Crop DamagePudhari
Published on
Updated on

पाथर्डी: तालुक्यात पावसाने मोठी दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके करपली असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बाजरी, कापूस, तूर, सोयाबीन, उडीद आदी पिकांना पावसाची नितांत गरज असताना पावसाने पाठ फिरविल्याने अनेक भागांत पिकांची वाढ खुंटली असून, पिके करपली आहे.

शासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेल्या गावांमध्ये टँकर सुरू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तालुक्यासह खरवंडी कासार परिसरातील परिस्थितीही चिंताजनक बनली आहे. परिसरातील बहुतांश खरीप पिके पावसाअभावी जळू लागली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

पावसाने आणखी ओढ दिल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यावरही ताण वाढत असून, वाढीव टँकर सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Kharif Crop Damage
Rahuri Leopard Attack: शेतकरी बापलेकाची बिबट्याशी झुंज; राहुरी तालुक्यातील मांजरी शिवारातील घटना, ग्रामस्थ भयभीत

तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची लागवड करण्यासाठी बँका, पतसंस्था, तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन पेरणी केली. मात्र, पेरणीनंतर पावसाने मोठी दडी मारल्याने पिकांना आवश्यक पाणी मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर कर्जाची परतफेड, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि पशुधनाचा सांभाळ अशी तिहेरी संकटे उभी राहिली आहेत.

जिल्ह्यातही ऑगस्ट महिन्यात पावसाची मोठी ओढ असल्याने खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होत असल्याचे अलीकडील अहवालांत नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील धरणांच्या लाभक्षेत्राबाहेरील गावांतील पिकांना पावसाच्या तुटीचा मोठा फटका बसत असल्याचेही वृत्त आहे.

Kharif Crop Damage
Shirdi Sai Baba Temple Donation: साईचरणी ११ लाखांचे हिरेजडित सुवर्ण ब्रोच

पंचनाम्यांसह तातडीच्या उपाययोजनांची गरज

तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिकांची परिस्थिती प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त क्षेत्र निश्चित करावे. पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाच्या निकषांनुसार नुकसानभरपाई द्यावी.

त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, पशुधनासाठी चारा आणि शेतकऱ्यांना आवश्यक ती आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने विलंब न करता उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

पावसाअभावी केवळ पिकेच नव्हे, तर पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. शेतातील हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने जनावरांच्या संगोपनाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे शासनाने चारा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.

- संजय कीर्तने

तालुक्यातील अनेक भागांत खरीप पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने पंचनामे करण्यात यावेत. पावसाची प्रतीक्षा करताना पिके हातातून गेली असून आता शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात द्यावा. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत असल्याने आवश्यक त्या ठिकाणी टँकर सुरू करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

- सुरेश बडे, शेतकरी, भिलवडे

logo
Pudhari News
pudhari.news