

नगर तालुका: नगर तालुक्यातील जेऊर येथे घुरुडी डोंगरावर सुरू असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाचे नियोजनाअभावी मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच निवेदन देण्यात आले असून, त्यामध्ये ग्रामस्थांनी गंभीर आरोप केले आहेत. मनमानी पद्धतीने व दडपशाहीने काम सुरू असल्याचा आरोप निवेदनामध्ये करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये ग्रामस्थांच्या वतीने संबंधित सौर ऊर्जा प्रकल्पाबाबत विविध प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत.
जेऊर येथील घुरुडी डोंगरावर गट क्रमांक 117 मध्ये 31 एकर सरकारी जागेवर मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी अंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम जोरात सुरू आहे. प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल व प्रकल्प शासनाचा असल्याचे सांगत संबंधित कंपनी ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
कंपनीला सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी संबंधित जागेची हद्द निश्चित करून घेण्याची अट घालण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात हद्द निश्चित न करता काम सुरू करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालयाला याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. तसेच जमीन हस्तांतरण झाले असले, तरी जमीन विकसित करण्याची परवानगी नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये असून त्याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली आहे.
संबंधित ठेकेदार केवळ काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने पोलिसांचा धाक दाखवून व शासनाचे काम असल्याचे सांगून मनमानी करीत आहे. ज्या रस्त्यावर खांब उभारणी सुरू आहे. त्या रस्त्याची अधिकृत मोजणी व हद्द निश्चिती अत्यावश्यक असून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. कोणतीही हद्द निश्चिती न करता रस्त्यावर खांब उभारणी करण्याचे काम सुरू आहे. बहिरवाडी रस्त्यालगत मागील महिन्यात विद्युत वाहिनी साठी खांब उभरले होते. परंतु स्थानिकांचा विरोध व सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र यामुळे संबंधित ठेकेदाराला काम बंद करावे लागले.
उभारलेले खांब पुन्हा काढण्यात आले आहेत. यावरून संबंधित प्रकल्प उभारताना कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याचे व दडपशाहीने शासनाचे काम म्हणून धाक दाखवत मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. बहिरवाडी रस्त्यालगतचे पोल हटविल्यानंतर जुन्या इमामपूर (खोल ओढा) रस्त्यालगत विद्युत पोल उभारणीचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आले आहे. सदर रस्त्यावर अतिक्रमणे झाली आहेत. रस्त्याची अधिकृत मोजणी व हद्द निश्चित झालेली नाही. अशा परिस्थितीत पोल उभारणे चुकीचे व धोकादायक ठरणार आहे.
सदर रस्त्यावरील अतिक्रमण हटवून डांबरीकरण करण्यासाठी परिसरातील नागरिकांचा पाठपुरावा सुरू आहे. याबाबत खुद्द पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा स्थितीत रस्त्यावर खांब उभारल्यास परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, लहान मुले व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रथम रस्त्याची मोजणी करून हद्द निश्चित करण्यात यावी व त्यानंतरच काम करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जेऊर येथील सौरऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्णपणे मनमानी पद्धतीने सुरू असून ते तत्काळ थांबविण्यात यावे. संबंधित कंपनीला परवानगी देताना दिलेल्या अटी व नियमांचे पूर्णपणे पालन झाले आहे किंवा नाही याचीही चौकशी करण्यात यावी. अन्यथा ग्रामस्थांच्या रोषाचा उद्रेक होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनावर अजय पवार, दिनेश पाटोळे, रवींद्र पवार, पांडुरंग पवार, महेश ससे, बबन शिंदे, अशोक पवार, सोनाली पवार, मयूर पवार, अमोल तोडमल, वैशाली तोडमल, सुमन तोडमल, नंदकुमार तोडमल, अश्विनी ससे, दिनेश ससे, निर्मला ससे, सौरभ शिंदे, संपत शिंदे, मीना शिंदे, शरद शिंदे, महेश दारकुंडे, सुमन दारकुंडे, सिद्धेश्वर दारकुंडे, अलका शिंदे, छाया पवार, सलीम शेख, सुरज ससे, मुस्ताक शेख, साकिब शेख, विजय वाघ आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
661 झाडांचा पंचनामा
सौरऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी लिंब, बाभूळ, हिवर, शिसम अशा विविध प्रजातींची 661 झाडे तोडण्यात आली. त्या बदल्यात 1983 झाडे लावण्याचे व संगोपन करण्याचे बंधन संबंधित कंपनीवर घालण्यात आले आहे. तोडलेली झाडे कुजून चालली आहेत. त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली असती, तर फायदा झाला असता. परंतु संबंधित कंपनीला कशाचेही देणे घेणे नसून फक्त काम पूर्ण करण्याची घाई झाली असल्याचा आरोप होत आहे.
ग्रामपंचायत प्रशासन अनभिज्ञ
ज्या गावामध्ये एवढा मोठा प्रकल्प उभारत आहे. अशा जेऊर ग्रामपंचायतला संबंधित कंपनीकडून साधी कल्पना देखील देण्यात आली नाही अथवा तशी तसदी देखील घेतली गेली नाही. स्थानिक कुणालाही विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने व दडपशाहीने काम उरकण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.