

नगर : एनआरसीच्या टेस्टींग संचमान्यतेनुसार मराठीचे 223 तर उर्दू माध्यमाचे 16 असे जिल्ह्यात 239 शिक्षक अतिरिक्त ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, अंतिम संचमान्यतेनंतर अतिरीक्त शिक्षकांचे आंतरजिल्हा बदलीने समायोजन केले जाण्याची शक्यता असून, असे झाल्यास संबंधितांना बाहेरच्या जिल्ह्यात जाण्याची वेळ येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या 3534 शाळा आहेत. यामध्ये पहिले ते पाचवीच्या वर्गात 1 लाख 83 हजार 410 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. संचमान्यतेनुसार या विद्यार्थ्यांसाठी 9270 शिक्षकांची मान्यता आहे. मात्र सध्या या शाळांवर 9400 शिक्षक कार्यरत असल्याचे समजते. त्यात मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये 130 शिक्षक अतिरीक्त ठरत असल्याचे दिसत आहे. 6 ते 8 वीच्या वर्गात 19 हजार 515 विद्यार्थी धडे घेत आहेत. त्यांच्यासाठी 918 शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र प्रत्यक्षात आज 1011 शिक्षक कार्यरत असल्याचे आकडेवारी सांगत आहेत. त्यामुळे या ठिकाणीही 93 शिक्षक हे अतिरीक्त ठरताना दिसत आहे. याशिवाय मुख्याध्यापकांची 420 पदे मंजूर असून, येथे 424 मुख्याध्यापक नियुक्त केलेले आहेत. येथेही चार मुख्याध्यापकांचे समायोजन करावे लागणार आहे.
जिल्ह्यात 80 उर्दू शाळा असून, तिथे 3467 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी 187 पदे मंजूर असून, प्रत्यक्षात 166 पदेच भरलेली आहे. येथे 21 पदे रिक्त दिसत आहेत. मात्र सहावी ते आठवीच्या उर्दूच्या 1269 विद्यार्थ्यांना 60 शिक्षकांची पदे मंजूर असताना, तिथे प्रत्यक्षात 76 शिक्षक काम करत आहेत. त्यामुळे येथे 16 पदे अतिरीक्त आहेत.
दरम्यान, उर्दूचे अतिरीक्त शिक्षक उर्दू शाळांवर समायोजित होऊ शकतात, मात्र मराठी माध्यमांच्या 149 शिक्षकांचे समायोजन कोठे करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, 2024-25 च्या संचमान्यतेचे काम सुरू आहे. त्या कंपनीच्या हा टेस्टींग (प्राथमिक) रिपोर्ट आहे. यातील त्रुटी असतील तर त्या दूर करून यात बदल होऊ शकतो, मात्र जर असाच अंतिम अहवाल आला तर अतिरीक्त शिक्षकांचे समायोजन आंतरजिल्हा बदलीने ‘बाहेर’ केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळे अतिरीक्त ठरणार्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.