

खेड: तालुक्यातील करमनवाडी परिसरातील मेरगळवस्तीत शनिवारी (दि. 5) रात्री 10 वाजता एक हरीण जखमी अवस्थेत तडफडत आढळून आले. त्याच्यावर उपचार करण्यास वनविभाग टाळाटाळ करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जखमी हरणाला उपचाराची गरज असतानाही, वनविभागाच्या अधिकार्यांनी रात्र असल्याचे कारण देत थेट हात झटकले. हरीण घरी न्या, सकाळी कर्मचारी येतील, असे उत्तर देऊन ते मोकळे झाले. संदीप मेरगळ यांनी प्रयत्न करूनही वनविभागाकडून कुठलीही तातडीची कृती झाली नाही. दुसर्या दिवशी फोन केल्यानंतर कर्मचारी पाहणीसाठी आले खरे, पण वाहन आणण्याचे सांगत परतले. (Latest Ahilyanagar News)
एकीकडे कागदोपत्री वन्यजीव संरक्षणाचे मोठमोठे दावे केले जातात, तर दुसरीकडे जमिनीवर या गोष्टी केवळ कागदापुरत्या मर्यादित राहतात, हे या घटनेतून दिसून येते. सलमान खानच्या काळवीट प्रकरणावर देशभर गदारोळ उठतो, पण जिथे प्रत्यक्षात एक जिवंत प्राणी वेदनेत तडफडतो आहे, तिथे वनविभागाचे अशा प्रकारचे उदासीन वर्तन निंदनीय ठरते. दुर्लक्षामुळे त्या हरीनाचा जीव गेला, तर त्या निष्पाप जीवाच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.