

अमोल बी गव्हाणे
श्रीगोंदा : इन्फनेट बिकन या शेअर मार्केटशी निगडित असलेल्या कंपनीच्या संचालकांनी जादा परताव्याच्या आमिषाने 16 हजार गुंतवणूकदारांना जवळपास एक हजार कोटी रुपयांना गंडा घातला असल्याची प्राथमिक माहिती असली तरी या गुंतवणुकीचा आकडा नेमका किती हे समोर येणार आहे.
दोन वर्षापूर्वी इन्फनेट बिकन नामक कंपनीचा संचालक नवनाथ औताडे याने श्रीगोंदा तालुक्यातील संदीप दरेकर याच्यासह इतर काही मंडळींना हाताशी धरून लोकांना जादा परताव्याचे आमिष दाखविले गेले. लोकांनी या कंपनीत पैसे गुंतवणूक करावेत यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये कमिशन एजंट लोकांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्यात यायचे. बघता बघता नवनाथ औताडे अन् त्याच्या खाली काम करणार्या टीमचा तालुक्यात गवगवा झाला. कमिशन एजंट लोकांनी प्रत्येक गावात जाऊन लोकांना, नातेवाईक मंडळींनी यामध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडले.
जादा परतावा मिळणार असल्याने व यामध्ये स्थानिक मंडळी असल्याने लोकांना विश्वास वाटला. अनेकांनी शेती गहाण ठेवून कर्ज काढली, महिलांनी साठवलेले पैसे, दागिने गहाण ठेवून उपलब्ध झालेले पैसे इन्फनेट या कंपनीत टाकले. काही दिवस परतावा आला नंतर मात्र कंपनीने परतावा देण्याचे बंद केले. औताडे याने वेळोवेळी बैठका घेऊन पैसे देण्याची ग्वाही दिली मात्र सहा महिन्यात त्यांना लोकांना परतावा देता आला नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच अनेक गुंतवणूकदारानी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात धाव घेतली. दोन दिवसांपूर्वी याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने इन्फनेट बिकन या कंपनीचा भांडाफोड झाला आहे.
औताडे याने जादा परताव्याचे आमिष दाखवून जवळपास एक हजार कोटी उचलले तर पश्चिम महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब या भागातून जवळपास तीन हजार दोनशे कोटी रुपये उचलले असल्याची प्राथमिक माहिती आहे. अर्थात हे आकडे वरवरचे असले तरी पोलिस तपासात यामधील वस्तुनिष्ठता स्पष्ट होणार आहे.
गेल्या दीड-दोन वर्षात या कंपनीने तालुक्यात चांगलाच धुमाकूळ घातला होता. जास्तीत जास्त पैसे गोळा करून ते कंपनीला देण्यासाठी एजंट लोकांमध्ये स्पर्धा लागली होती. या एजंट लोकांच्या दर आठवड्याला पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार्या बैठका तालुक्यात चर्चेचा विषय ठरत होत्या.
जो जास्त पैसे गोळा करून कंपनीला देईल त्याला कंपनीकडून बक्षिसी मिळत होती. गेल्या दीड वर्षात एजंट म्हणून काम करणार्या शेकडो लोकांना या इन्फनेट कंपनीने परदेशवारी घडवून आणली. विनासायास कमिशन मिळत असल्याने या एजंट लोकांचा चांगलाच बोलबाला झाला होता. आता मात्र कंपनीने लोकांना परतावा देण्याचे बंद केल्याने या एजंट लोकांवर तोंड लपवण्याची वेळ आली आहे.