

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मला ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे, याचेच जास्त वाईट वाटत आहे. पक्षातील काही लोकदेखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानाला लागून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. पण मी अभिमन्यू नाही, अर्जुन आहे! अशी स्पष्ट भूमिका मांडतानाच ऊसतोड कामगार, वैद्यनाथांच्या परळीला आणि बीड जिल्ह्याला बदनाम करू नका, असे आवाहन मंत्री धनंजय मुंडें यांनी केले.
बीड जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात झालेली संतोष देशमुख यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक होती. संतोष देशमुख यांच्या मारेकर्यांना फासावरच लटकवले पाहिजे, हे माझे पहिल्या दिवसापासून स्पष्ट मत आहे. गुन्हेगारी ही एक नीच वृत्ती आहे. त्याला जात-धर्म नसतो. मात्र या घटनेच्या आडून जात म्हणून एका समाजाला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवले जात आहे. सातत्याने आमची मीडिया ट्रायल केली जात आहे.
म्हणून विधानसभेलाही मलाच टार्गेट केले
लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी गेलो होतो. त्यावेळी बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा वहिनींच्या प्रचारासाठी जाऊ नकोस. अन्यथा पुढे विधानसभेत त्याचा तुला त्रास होईल, असा सल्ला मला अनेकांनी दिला होता. मात्र तरीही मी गेलो. माझ्यासह अनेकांना विधानसभा निवडणुकीत ठरवून टार्गेट केले गेले. ठाण्यात मी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला गेलो म्हणून तिथले नेते बीडमध्ये येऊन मला टार्गेट करत आहेत, हेही उघड झाले, असे मुंडे म्हणाले.