

श्रीगोंदा : संत शेख महमंद महाराज यांचे वंशज आमीन शेख हे आमच्याबद्दल जाणूनबुजून चुकीची माहिती पसरवत आहेत. त्याना मूळ वंशजाविषयी संभ्रम निर्माण करायचा आहे. आमची ही सर्कस आता संपली आहे. आता नेत्यापेक्षा गावकर्यांनी निर्णय घ्यावा. संत शेख महमद महाराज यांचा मीच खरा वंशज आहे. तो वंशज नाही, त्यांना आमच्या पूर्वजांनी मदतीला आणले होते. मात्र ते आता वंशज असल्याचे सांगत आहेत. आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत. आम्हाला गावाने मदत करावी, अशी साद येथील अय्याज शेख यांनी पत्रकार परिषदेत घातली.
संत श्री शेख महंमद महाराज मंदिराची नोंदणी वक्फ बोर्डाकडे केली आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धार करण्यासाठी गावकरी, वारकरी हे तहसील कार्यालयासमोर कीर्तन भजन करून धरणे आंदोलन करत आहेत. यात्रा कमिटीच्या वतीने भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेण्यात आली
संत श्री शेख महंमद महाराज यांचे आचार आणि विचाराचे वारस आम्ही आहोत. गावकर्यांनी आमचा विचार करावा. 2008पर्यंत आम्ही ट्रस्टमध्ये होतो. संत शेख महंमद यांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतली. ते आम्हाला मान्य आहे. देवस्थान, मठाचा दर्गा करण्यास विरोध केल्याने आम्हाला कारस्थान करून मूळ ट्रस्टमधून बाजूला करण्यात आले. मंदिराचा दर्गा ट्रस्ट नोंद केला. याला आमचा विरोध आहे. आमची आमीन शेख यांच्या विरोधात न्यायालयीन लढाई सुरू असल्याचेही अय्याज शेख यांनी सांगितले.
यावेळी बोलताना घनश्याम शेलार म्हणाले की दर्गा ट्रस्ट रद्द व्हावे. वक्फकडील नोंदणी रद्द व्हावी. यानंतरच मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा. संत श्री शेख महंमद महाराज यांचा इतिहास बदलण्याचा काही मंडळीकडून प्रयत्न सुरू आहे. त्यांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न तथाकथित वंशज करत आहेत.
2008 साली विवाद का झाला, संत शेख महंमद यांच्याविषयी चुकीचे पुस्तक छापून ते वाटण्यात आले होते त्यामुळेच. ती चर्चा बंद खोलीत झाली नाही. आमच्याविषयी काही अडचण असेल तर सांगा पण चुकीच्या व्यक्तींना समर्थन करू नका. शेख महमंद महाराज देवस्थान मठ नोंदणी 1953 साली देवस्थान होते. पण नंतर त्याचा दर्गा ट्रष्ट केला. आता जीर्णोद्धार करण्यास विरोध नाही असे आमीन शेख सांगत असले तरी त्यांनी देवस्थान मठाचा दर्गा करून तो वक्फकडे नोंदणी केला आहे. पण याला संत, वारकरी, गावकरी मान्यता देत नाहीत. दर्गा ट्रस्ट रद्द व्हावे, देवस्थान मान्य असेल तरच चर्चेला यावे.
मालोजीराजे यांनी दिलेली मालमत्ता वक्फ बोर्डाकडे दिली. हा हेतू शुध्द नाही, असेही शेलार यांनी सांगितले.
अॅड.श्रीनिवास पत्की यांनी सांगितले की आमीन शेख यांनी वक्फ बोर्डाकडे केलेली नोंदणी लपून ठेवली. नंतर एका दाव्यात ही केस वक्फकडे वर्ग करावे असे त्यांचे म्हणणे होते. वक्फकडे नोंदणी झाली हे 2020-21 मध्ये कळले.
बाबासाहेब भोस म्हणाले की आम्ही आमदार विक्रम पाचपुते, बबनराव पाचपुते यांच्याबरोबर बोललो आहे. आम्ही सगळे एकत्र बसणार आहोत. लवकरच आंदोलन तीव्र करणार आहोत. यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष गोपाळ मोटे यांनी यात्रा उत्सवाचे सगळे काम पारदर्शक असल्याचे सांगून, आम्ही सगळ्या खर्चाचे ऑडीट करतो. सगळा हिशोब ठेवतो. मंदिर व्हावे हीच अपेक्षा आहे, असे सांगितले.