निवडणुकीत छोट्या-मोठ्या गोष्टी सोडल्या तर आपण कुठेही कमी पडलो नसल्याचे सांगत मी लढणारा व्यक्ती असून, येथून पुढेही लढणारच, असे सांगत माजी आ. शंकरराव गडाख यांनी तालुक्यातील जनतेचे आभार मानले.
मुळा कारखाना प्रांगणात झालेल्या आभार सभेसमोर ते बोलत होते. या वेळी मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, कारभारी जावळे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी कार्यकर्ते उपस्थित होते.
गडाख म्हणाले की, तालुक्यातील प्रत्येक गावात दोन ते तीन वेळा भेटी दिल्या. निवडणुकीत हार जीत चालूच असते. यश अपयशातून पुढे जावे लागेल यातून सावरायला मला साहजिकच थोडा वेळ लागणार असला, तरी लवकरच तालुक्यात प्रत्येक गावात जाणार आहे. तालुक्यात तिरंगी लढत असल्यामुळे विजय होईल असे कार्यकर्त्यांनी सांगितले तरी सर्वांना निवडणुका निवडणुकीच्या पद्धतीने घेण्यासाठी सूचना केल्या होत्या.
पराभवामुळे अनेकांना विकृत आनंद मिळाल्याचे सांगत येथून पुढे तालुक्याचे काय? शाश्वत विकासासाठी जी धमक लागते ती समोरच्यात आहे का हे आनंद घेणार्यांनी ठरवले पाहिजे असे सांगत सत्ता व पैसा मिळत होता; पण ते तालुक्याच्या निष्ठेसाठी नम्रपणे नाकारले. मी सोयीचे राजकारण केले असते तर मला अपयश कधीच मिळालं नसतं, असे सांगत आत्तापर्यंत मी अनेक संघर्ष केले त्यात हा संघर्ष खूप मोठा आहे. पुढेही मोठा संघर्ष करावा लागेल. तुम्ही साथ दिली तर मी नक्कीच यश मिळवून दाखवेल व विकासकामे पूर्ण करून दाखवेल, असा विश्वास दिला. कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना आवर घालण्याचे आवाहन गडाख यांनी केले.