अहिल्यानगरमध्ये हिंद केसरी स्पर्धा घेणार : आमदार संग्राम जगताप
नगर : अहिल्यानगरमध्ये झालेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ऐतिहासिक ठरली. कुस्ती क्षेत्राला दिशा देण्यासाठी तसेच नवे मल्ल घडवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. अहिल्यानगरमधील कुस्तीगीरांच्या सरावासाठी मोठी तालीम व कुस्तीचे केंद्र उभारण्याचे काम होणार आहे. अखिल भारतीय कुस्तीगीर व राज्य संघाने मान्यता दिल्यास अहिल्यानगरमध्ये हिंद केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन कुस्तीगीर संघाचे राज्य उपाध्यक्ष आ.संग्राम जगताप यांनी केले.
67 व्या महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धा व राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील विजेत्या मल्लांना गुरूवारी(दि.13) स्पर्धेचे आयोजक आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. महाराष्ट्र केसरी किताब विजेता पृथ्वीराज मोहोळ यास थार जिपची चावी देण्यात आली. तसेच, स्पर्धेतील प्रत्येक वयोगटातील विजेत्या मल्लांना बुलेट, स्प्लेंडर व अर्धातोळा सोन्याच्या अंगठ्या देण्यात आल्या. यावेळी राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप भोंडवे, सरचिटणीस योगेश दोडके, राज्य उपाध्यक्ष प्रा. विलास कथुरे, माजी आमदार अरुण जगताप, अंतिम लढतीचा प्रतिस्पर्धी महेंद्र गायकवाड, माजी उपमहापौर गणेश भोसले, महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे, बबन काशीद, जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष अर्जुन शेळके, सचिव संतोष भुजबळ, खजिनदार शिवाजी चव्हाण, सचिव नीलेश मदने, शिवाजी कराळे, युवराज करंजुले, अनिल गुंजाळ आदी उपस्थित होते. पाहुण्यांचा बजरंगबलीची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन निलेश मदने यांनी केले.अर्जुन शेळके यांनी आभार मानले.
बुलेटचे मानकरी(सुवर्णपदक)
माती विभाग : सौरभ इगवे (सोलापूर), सुरज अस्वले (कोल्हापूर), सद्दाम शेख (कोल्हापूर), सुशांत देशमुख (सोलापूर), अक्षय चव्हाण (पुणे), संदीप शिपकाळे (सातारा), चंद्रशेखर गवळी (धुळे), शिवचरण सोलंकर (सोलापूर), रोहन पवार (सोलापूर), गादी विभाग ः वैभव पाटील (कोल्हापूर), अजय कापडे (कोल्हापूर), ज्योतिबा आटकळे (सोलापूर), सौरभ पाटील (कोल्हापूर), आदर्श पाटील (कोल्हापूर), शुभम मगर (सोलापूर), मुन्तजिर सरनोबत (धाराशिव), श्रेयश गाट (क ोल्हापूर), कालिचरण सोलंकर (सोलापूर).
सोन्याच्या अंगठीचे मानकरी (कांस्यपदक)
माती विभाग ः ओमकार निगडे (पुणे), शनिराज निंबाळकर (सोलापूर), कुलदीप पाटील (कोल्हापूर), सौरभ शिंदे (अहिल्यानगर), नाथा पवार (सांगली), सुनील जाधव (सोलापूर), अंगद बुलबुले (पुणे), अर्जुन काळे (सोलापूर), सुहास गोडगे (गोंदिया). गादी विभाग ः युवराज माने (सोलापूर), रोहित पाटील (कोल्हापूर), पवन ढोन्नर, पांडुरंग माने (सांगली), आकाश नागरे (बीड), किरण सत्रे (सोलापूर), विपुल थोरात (पुणे), विकास करे (सोलापूर), योगेश्वर तापकीर, धैर्यशील लोंढे, संदीप लटके (अहिल्यानगर), सुजित यादव (मुंबई उपनगर), स्वप्नील काशीद (सोलापूर), गौतम शिंदे (सोलापूर), मोईन मुलानी (सोलापूर), ऋषिकेश पाटील (कोल्हापूर), ऋतुराज शेटके (कोल्हापूर), ओमकार येलभर (पुणे), वैभव माने (परभणी), चेतन रेपाळे (अहिल्यानगर)
स्प्लेंडर मानकरी (रौप्यपदक)
माती विभाग ः दिग्विजय पाटील (कोल्हापूर), स्वरूप जाधव (कोल्हापूर) अनिकेत मगर(सोलापूर), निखिल कदम (पुणे), निलेश हिरगुडे (कोल्हापूर), ऋषिकेश शेळके (अहिल्यानगर), हनुमंत पुरी (धाराशिव), श्रीनाथ गोरे (सोलापूर), विजय बिचकुले (सातारा), साकेत यादव(परभणी) गादी विभाग ः शुभम अचपळे (नाशिक), पुरुषोत्तम विसपुते (धुळे), मनीष बांगर (मुंबई), साताप्पा हिरगुडे (कोल्हापूर), दयानंद पाटील (सोलापूर), केतन घारे (पुणे), महेश फुलमाळी (अहिल्यानगर), अभिजीत भोईर (पुणे), बाळू बोडके(नाशिक).
उपमहाराष्ट्र केसरी’विना महेंद्र गायकवाड परतला
67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अंतिम सामन्यात शेवटचे 16 सेकंद बाकी असताना महेंद्र गायकवाड मैदान सोडून गेल्याने राज्य कुस्तीगीर संघाने त्याला बाद ठरवत त्यांचे बक्षीस नाकारले. कुस्ती महासंघाचा तसा नियम असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. महेंद्र गायकवाड बक्षीस वितरणासाठी अहिल्यानगरला आला होता. मात्र, तो रिकाम्या हाताने परत गेला.
अहिल्यानगर येथे झालेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागातून पृथ्वीराज मोहोळ विजयी झाला तर, माती विभागातून महेंद्र गायकवाड विजयी झाला. महाराष्ट्र केसरी किताबासाठी दोघांमध्ये अंतिम सामना झाला. या सामन्यात दोघांनाही निष्क्रितेचा एक एक गुण मिळाला होता. शेवटच्या एक मिनिटात पृथ्वीराज मोहोळ याचा डाव परतून लावताना महेंद्र गायकवाड मैदाना बाहेर गेला. त्यामुळे पृथ्वीराज मोहोळला एक गुण मिळाला. मात्र, त्यावर महेंद्र गायकवाड याने पंचांकडे हरकत घेतली. मात्र, त्याची हरकत पंचांनी फेटाळून लावली. त्यानंतर सामना पूर्ण होण्याला सोळा सेकंद बाकी असताना महेंद्र गायकवाड याने मैदान साडले. त्यानंतर पंचांनी पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषीत केले. 67 व्या महाराष्ट्र केसरी किताबाचा पृथ्वीराज मोहोळ मानकरी ठरला.
अहिल्यानगर येथे गुरूवारी महाराष्ट्र केसरी व अजिंक्य पद स्पर्धेतील विजेत्या मल्लांना बक्षीस वितरण करण्यात आले. त्यात विजेत्याला थार तर उपविजेत्याला बोलेरो गाडीच्या बक्षिसाची घोषणा आयोजकांनी केली होती. या बक्षीस वितरणासाठी महेंद्र गायकवाडही उपस्थित होता. मात्र, तो बक्षिसाविना परतला. अंतिम सामन्यात त्याने मैदान सोडल्याने भारतीय कुस्ती संघाच्या नियमानुसार महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने त्याला स्पर्धेतून बाद केले. विजयी मल्लांच्या यादीत त्याचे नावही नव्हते. त्यामुळे आज त्याला बक्षिसासा विनाच परत माघारी फिरावे लागले. त्याने आयोजकांशी संपर्क साधला पण, कुस्तीगीर संघाच्या नियमानुसार आम्ही निर्णय घेऊ असे त्याला सांगण्यात आले.
मैदान सोडल्याने मुकला
नियमानुसार मल्लाला कुस्ती अर्धवट सोडून गेल्यानंतर त्याला स्पर्धेतून बाद करण्यात येते. त्यामुळे अंतिम लढतीमध्ये पैलवान गायकवाड 16 सेकंदासाठी मैदान सोडून गेला. त्यामुळे संपूर्ण कुस्ती स्पर्धेतून बाद करण्यात आले. त्यामुळे उपमहाराष्ट्र केसरीचा किताब देता आला नाही.
