

Newasa News: नेवाशाचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे यांनी तालुक्यातील जीवन प्राधिकरण नळयोजनांची थकित वीजबिले भरण्यासाठी शासनाने मदत करावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले .
आमदार लंघे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशानात तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा परिस्थिती गंभीर असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. गळनिंब व घोगरगांव प्राधिकरण नळयोजनेला शासनाकडून कोट्यवधी रुपये सध्या दुरुस्तीसाठी खर्च केला जात आहे. मात्र, दुरुस्ती होऊनही या योजना थकित विजबिलाअभावी सुरु होणे अशक्य असल्याचे ते म्हणाले .
या योजना सुरु करण्यासाठी मोठ्या प्रमाणात थकित वीजबिल भरणे गरजेचे आहे. लाभार्थी गावांची ग्रामपंचायतीची अर्थव्यवस्था ही कमकुवत असल्याने त्यांना वीजबिल भरणे शक्य नसल्याने शासनाने थकित वीजबिल भरण्यासाठी मदत करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली.
आमदार लंघे यांनी तालुक्यातील शनैश्वर व ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचा विकासाचा मुद्दा उपस्थित केला. शनैश्वर देवस्थानमध्ये चुकीच्या पद्धतीने कारभार सुरु आहे. निवडणुकीपूर्वी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अधिवेशात या विषयावर प्रश्न उपस्थित केल्याची आठवण करुन दिली. अनियमित कारभाराची चौकशी करुन समिती बरखास्त करण्याची मागणी करत सभागृहाचे लक्ष वेधले.
नेवाशाचे ज्ञानेश्वर मंदिर हे तीर्थक्षेत्र जगभर प्रसिद्ध असूनही गेल्या कित्येक वर्षांपासून विकासापासून वंचित आहे. ज्ञानेश्वर मंदिराचा तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आठशे कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. लवकर निधी मंजूर होऊन विकासाला गती मिळाली, तर तेथील पर्यटन तीर्थक्षेत्र म्हणून नावलौकीक होऊन तालुक्याच्या विकासात भर पडेल.
पाणीयोजनांना प्राधान्य दिल्याने समाधान
आमदार लंघे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्याबरोबर 14 गावांसह वाड्या-वस्त्यांना जीवनदायिनी ठरलेल्या प्राधिकरण नळ योजना सुरू करण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले होते. आता आमदार म्हणून विधानसभा सभागृहातही हाच पाणीप्रश्न मांडल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.