संगमनेर शहरात हनुमान जयंतीच्या उत्सवाला गालबोट; पोलिसांसमोरच आयोजक-वादक भिडले
संगमनेर: शहरातील पारंपारिक हनुमान रथाची शनिवारी मिरवणूक सुरू असतांना ढोल वाजवण्याचा कारणावरून तरुणांच्या दोन गटात हाणामारी झाली. दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी संगमनेर शहरातून चंद्रशेखर चौक येथून हनुमान रथाची मिरवणूक निघत असते. इंग्रजांच्या काळापासून हा रथ ओढण्याचा मान महिलांना आहे. आजही ही परंपरा पाळली जाते. यामुळे या मिरवणुकीला जिल्ह्यात विशेष महत्त्व असते.
शहरातील व तालुक्यातील सर्वच महिला या ठिकाणी रथ ओढण्यासाठी सकाळी आवर्जून उपस्थित राहतात. शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सकाळी वाजत गाजत ध्वज रथावर लावला जातो.
यानंतर मिरवणुकीला सुरुवात होते. शनिवारी ही हनुमान जयंतीच्या दिवशी अशीच मिरवणूक सुरू असताना ढोल वाजवण्याच्या कारणावरून तरुणांच्या दोन गटात वादावादी झाली .प्रकरण वाढत जाऊन हाणामारीचा प्रकार घडल्याने पोलिसांनी मध्यस्थी करून तरुणांची समजूत काढली. यानंतर ही मिरवणूक सुरळीत सुरू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

