

नेवासा : अनेक दिवसांपासून नेवासा शहरावर घोंगावत असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला सोमवार पासून प्रारंभ झाला. शहरातील श्रीरामपूर रस्ता आता मोकळा श्वास घेणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा अतिक्रमणांवर हातोडा पडण्यास सुरुवात झाल्याने शहरातील श्रीरामपूर रस्त्यावरील अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील श्रीरामपूर रस्त्यासह नेवासा फाट्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमणधारकांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तेव्हापासून अतिक्रमणधारकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. रस्त्याच्या मध्यापासून 12 कि 15 मीटर अशी चर्चा सतत होत होती. त्यामुळे काहींनी 12 मीटर पर्यंत आपापली अतिक्रमणे काढून घेतली होती. काहींचे अतिक्रमण ‘जैसे थे‘ होते. ही अतिक्रमणे हटाव मोहिम कधी होईल, हे कोणीही सांगू शकत नव्हते. व्यापार्यांच्या अधूनमधून बैठका होत होत्या. 12 मीटरपर्यंत अतिक्रमणे हटविण्याची मागणी सतत होत राहिली. पंरतु सोमवारी जेव्हा अतिक्रमणे हटविण्यासाठी पोलिस बंदोबस्तात चार-पाच जेसीबी श्रीरामपूर रस्त्यावर गणपती चौकात आल्यानंतर अतिक्रमणधारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.
वेगवेगळ्या चर्चा झडत असतांना बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुरेश दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटरपर्यंतची अतिक्रमणे काढण्याची मोजमापे सुरू झाल्याने आता 15 मीटर अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले.
सकाळी 10 वाजता ही मोजमापे सुरू होऊन प्रत्याक्षात 12 वाजता अतिक्रमणांवर जेसीबीचा हातोडा पडण्यास सुरुवात झाली. प्रारंभी श्रीरामपूर रस्त्यावरील राजवाडा, मराठा बोर्डिंग बाजूकडील अतिक्रमणे पाडण्यास सुरुवात करण्यात आली. राखीव दलांच्या पोलिसांसह पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला. अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात झाल्याने मराठी शाळा, बसस्थानक परिसरातील अतिक्रमणधारक स्वतःहून दुकानातील साहित्य, शेड, पत्रे काढण्यास वेग आला होता.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नेवासा फाट्यावरील बांधकाम विभागाने काही प्रमाणात अतिक्रमणे काढली आहेत. नेवासा-श्रीरामपूर रस्ता-नेवासा फाटा या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. यानंतर शहरातील व खुपटी रस्त्यावरील नगरपंचायतीच्या हद्दीतील अतिक्रमणे काढण्याच्या नोटिसा बजावल्याने संबंधितांची े धाकधूकीचे वातावरण निर्माण झाली आहे.
नेवासा शहरातील श्रीरामपूर रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात सुरुवात झाली आहे. येथील रस्ताही मोकळा श्वास घेणार आहे. पंरतु आता या लोकांचे पुनर्वसन करण्याची मागणी अतिक्रमणधारकांच्यावतीने करण्यात आली आहे.
पाथर्डी नगरपरिषदेने सोमवारी (दि. 3) पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभाग पथकाने रस्त्यावर छोट्या अतिक्रमणाबरोबर व्यापार्यांनी दुकानाबाहेर लावलेले सामान व जाहिरात फलक जप्त केले आहेत. या कारवाईचे एकीकडे स्वागत होत असताना दुसरीकडे साहित्य जप्त केलेले छोट्या व्यावसायिकांनी ही कारवाई तोंड पाहून होत असल्याचा आरोप करत नगरपरिषद कार्यालयात जाऊन याचा जाब विचारला.
वाहतुकीला अडथळा ठरणारी रस्त्याच्या बाजूने तात्पुरते अतिक्रमण करून व्यवसाय करणार्यांवर अतिक्रमण पथकाने धडक कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त केले आहे. जानेवारी महिन्यात महसूल, पाथर्डी नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण मोहीम राबवण्यास सुरुवात केली. सोमवारी झालेल्या कारवाईत अतिक्रमण विभागाने लोखंडी व लाकडी बाकडे, खुर्च्या, लोखंडी टेबल, जाहिरात फलक, हातगाडे हे साहित्य शहरातील जुना बस स्टॅन्ड परिसर, शेवगाव रोड, कोरडगाव रोड, नाईक चौक, अजंठा चौक, संस्कार भवन चौक परिसरात मोहीम राबून जप्त केले आहेत.
दरम्यान, शहरात नाईक चौक ते मोहटा गावाकडे जाणार्या रोडवर जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या भिंतीसमोर रस्त्यावर फळ विक्रीसाठी लावून नाईक चौक बाजूकडून येणार्या-जाणार्या वाहनांना अपघात होईल अशा रितीने हातगाडी रस्त्यावर लावण्यात आल्याने पोलिसांनी अफरोज अल्ताफ बागवान (रा. मेन पेठ), जावेद फारूक बागवान (रा. चिंचपूर रोड), समद रौफ बागवान, समीर रौफ बागवान (रा. मौलाना आझाद चौक, पाथर्डी) या चार हातगाडी मालकांवर गुन्हा दाखल केला आहे.