

नगर : गुरुजींच्या बदल्यांच्या प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये संवर्ग एकमधून दिव्यांग, घटस्फोटीत, परितक्त्या, दुर्धर आजार इत्यादी प्रकारातून बदलीचा लाभ मिळविण्यासाठी 2247 गुरुजींनी अर्ज केले आहेत. मात्र, ग्रामविकास विभागाच्या कालच्या आदेशाने बोगस दाखल्यांच्या आधारे बदलीचा लाभ घेतल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे संकेत मिळाल्याने अनेकांचे धाबे दणाणल्याचे बोलले जाते.
जिल्हा परिषदेच्या 3500 हून अधिक शाळा आहेत तर साधारणतः 12 हजारांपेक्षा अधिक शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. मागील दोन वर्षांपासून ऑनलाइन बदल्याच झालेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षकांनाही बदल्यांचे वेध लागलेले आहेत. यात शक्यतो 2019 मध्ये बदलून गेलेले शिक्षक प्रशासकीय बदल्यांसाठी जास्त पात्र दिसत आहे. शासनाच्या संकेतस्थळावर बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. साधारणतः तीन टप्प्यात ही प्रक्रिया केली जाणार आहे. प्रशासकीय बदल्यांसाठी पात्र असलेल्या शिक्षकांची माहिती समोर येताना दिसते आहे.
संवर्ग चारमधून 4046 इतके शिक्षक पात्र आहेत. पाच वर्षे एकाच शाळेत शिकवलेले तसेच 10 वर्षे एकाच क्षेत्रामध्ये नोकरी करणार्या शिक्षकांना प्रशासकीय बदलीस पात्र ठरवले जाते. संवर्ग तीन या अवघड क्षेत्रामधून 574 शिक्षकांना ‘बाहेर’ यायचे आहे. संवर्ग दोनमध्ये 389 शिक्षक पती, पत्नींना सोयीच्या ठिकाणी बदली हवी आहे. तर, संवर्ग एक हा नेहमीच वादग्रस्त ठरलेला आहे. यात 2260 शिक्षकांनी बदलीसाठी माहिती सादर केलेली आहे. यात 53 वर्षे पूर्ण, दुर्धर आजार, दिव्यांग, घटस्फोटीत, विधवा, मतीमंद पाल्यांचे पालक यांना हव्या त्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी विशेष प्राधान्य मिळते आहे.
संवर्ग एकमधून बदलीसाठी 250 गुरुजींनी दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र जोडले आहे. यात अनेकांना हृदयाचा, पक्षघाताचा त्रास आहे, तर काहींना अक्षरशः मेंदूचे विकार असल्याचेही पुढे आले आहे.
संवर्ग एकमध्ये बदलीसाठी प्राधान्य देताना जर एखाद्या शिक्षकाचा पाल्य मतीमंद असेल तर त्याला लाभ दिला जातो. एका तालुक्यात एका शिक्षकाला दोन मुले आहेत. त्यांनी केवळ बदलीत प्राधान्य मिळावे, यासाठी अक्षरशः एक मतीमंद मुलगा दत्तक घेतल्याचे एका गुरुजीनेच बिंग फोडले आहे. एवढेच नाही तर प्रशासकीय सोयीसाठी अशाप्रकारे कागदोपत्री मतीमंद मुले दत्तक हवी असतील तर त्यांच्या संगोपनासाठी वर्षाला पाच हजारांपासून पुढे पावती फाडून त्याची कागदपत्रे उपलब्ध करून देणारी यंत्रणाही कार्यरत असल्याने सांगितले. यात खरे काय, खोटे काय माहिती नाही, मात्र हा किस्सा अवाक करणारा आहे.
बोगस दिव्यांग प्रकरण जिल्ह्यात गाजत असतानाच, संवर्ग एकमधील 2260 बदली पात्र शिक्षकांमध्ये 328 दिव्यांग शिक्षकांचा समावेश आहे. यात अस्थीव्यंग आणि कर्णबधीर दिव्यांग असलेले शिक्षक अधिक आहे. 34 शिक्षकांचे अर्ज तालुकास्तरावर वेगवेगळ्या त्रुटीतून बाद करण्यात आले आहेत. तर उवर्रीत दिव्यांग गुरुजीही तपासणीनंतरच बदलीसाठी पात्र ठरवावे, असाही खासगीत सूर आहे. त्यामुळे तक्रार आल्यास जिल्हा शल्यचिकित्सकांकडून पुन्हा तपासणी केली जाणार आहे. दिव्यांग प्रमाणपत्राची त्रिसदस्यी समितीकडून पडताळणी करण्याचेही ग्रामविकास विभागाचे आदेश आहेत.
बदलीसाठी संवर्ग एकमधील प्राप्त माहितीनुसार, परितक्त्या तसेच घटस्फोटीत महिला शिक्षकांची संख्या 60 इतकी असल्याचे सांगितले जाते. मात्र या बदल्यांमध्येही काही तक्रारी प्राप्त झाल्यास घटस्फोटाबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशाची, पती सोबत राहत नसल्याची गावात जाऊन पडताळणी करण्याचेही ग्रामविकास विभागाने म्हटले आहे.