

नगर: नव्या शैक्षणिक वर्षात रिक्त असलेली केंद्र प्रमुख पदे पदोन्नतीने भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागातून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. ज्येष्ठतेनुसार निवडलेल्या 119 जणांपैकी शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांमध्ये बसणार्या 35 पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापकांना केंद्र प्रमुख म्हणून पदोन्नती दिली जाणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी आपल्या पहिल्याच बैठकीत शिक्षण विभागातील रिक्त जागांचा आढावा घेतला. तसेच केंद्र प्रमुख पदाच्या पदोन्नतीबाबतही सूचना केल्याचे समजले. या अनुषंगानेच शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी केंद्र प्रमुख पदावर पदोन्नत्या देण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले जाते.
जिल्ह्यात 246 केंद्र आहेत. यामध्ये उर्दूची 5 केंद्र आहेत. 1 जानेवारी 2022 च्या शासनानिर्णयानुसार 50 टक्के जागा पदोन्नतीने आणि 50 टक्के जागा स्पर्धा परीक्षेतून भरण्याचे आदेश आहेत. त्यामुळे मराठी माध्यमाच्या 241 जागांपैकी 50 टक्के 121 पदोन्नतीने, आणि 120 जागा स्पर्धा परीक्षेतून भरल्या जात आहेत. त्यातच, पदोन्नतीच्या सर्वच जागा 21 सप्टेंबर 2023 दरम्यान भरलेल्या होत्या. मात्र आता संबंधित अधिकार्यांच्या सेवानिवृत्तीमुळे 35 जागा रिक्त झाल्या आहेत. त्या जागा भरल्या. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील पदवीधरांच्या ज्येष्ठतेनुसार 119 जणांना प्रथमदर्शनी पात्र ठरवले आहे. आता यामध्ये सहा वर्षे पदवीधर प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा केलेले शिक्षक, पदवीधर मुख्याध्यापकांमधून संबंधित पात्र 35 जणांना केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती दिली जाणार आहे.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या केंद्र प्रमुख पदावर पदोन्नती मिळत असल्याने शिक्षकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. तर काही शिक्षकांना ही पदोन्नती पदवीधरची सहा वर्षे विचारात न घेता केवळ एकूण सेवा ज्येष्ठतेनुसार व्हावी, अशी अपेक्षा होती. त्यांच्यामधून मात्र नाराजी व्यक्त केली जात आहे.