

पाथर्डी: तालुक्यात सोमवारी मध्यरात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने शहर व परिसरात दाणादाण उडाली. शहरातील रस्ते, चौक, उपनगर, तसेच नदीकाठची वस्ती पाण्याखाली जाऊन जनजीवन विस्कळीत झाले. अनेक व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने, घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.
अतिवृष्टीमुळे पाथर्डी शहरातील महामार्ग व राज्य महामार्ग पाण्याखाली गेले. रस्त्यावरून ओढे वाहू लागल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. शेवगाव रोडवरील जुन्या बसस्थानकापासून निघालेले पाणी नाथनगर व रस्त्यावरून वाहत नव्या बसस्थानकात शिरले. त्यामुळे बसस्थानक परिसरातूनही पुरासारखा प्रवाह वाहत होता. (Latest Ahilyanagar News)
येथीलच दुकानांत व कॉम्प्लेक्समध्ये पाणी गेले. शहरातील गर्जे, मुंडे कॉम्प्लेक्स या इमारतींच्या तळघरात पाणी शिरल्याने माल व साहित्याचे मोठे नुकसान झाले. मुंडे कॉम्प्लेक्समध्ये गर्भगिरी मॉल्समध्ये पाणी शिरल्याने आर्थिक नुकसान झाले. कोरडगाव चौकातील भानुप्रयाग कॉम्प्लेक्समधील दुकानांमध्ये पाणी साचले.
माणिकदौंडी रोडवरील मित्रधन कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यातील दुकानांनाही नुकसान सहन करावे लागले. नगर रोडवरील देशमुख कॉम्प्लेक्समधील नागेबाबा पतसंस्थेच्या खाली असलेल्या गाळ्यात पाणी भरून जलमय स्थिती झाली. येथीलच शहरातील ओढ्यालगतच्या वाड्या, घरे व दुकाने पाण्याखाली गेली. अनेक घरांमधील संसारोपयोगी साहित्य व अन्नधान्याचे नुकसान झाले.
चिंचपूर रोडवरील गुगळे पेट्रोलपंपात पाणी शिरले. हनुमान बाग नदीला आलेल्या पुरामुळे हनुमान मंदिर, शनी मंदिर पूल, गाडगे आमराईतील देवीचे मंदिर यांना पाण्याचा वेढा पडला. आसरानगर, भापकर हॉस्पिटल परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. शिक्षक कॉलनीतील आसाराम गोसावी यांच्या घरावर वीज कोसळून इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान झाले.
शहरालगतच्या शिरसाटवाडी पाझर तलाव व बिबे आंबा तलाव पूर्ण भरले. या तलावांच्या वर असलेले अनेक छोटे बंधारे फुटल्याने पाणी परिट नदीत मिसळले. त्यामुळे पाथर्डी शहराजवळील नदीकाठच्या वस्त्यांना पुराचा धोका निर्माण झाला.
बिबे आंबा तलाव फुटण्याची भीती निर्माण झाल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून सांडव्याची भिंत फोडून पाणी सोडले. हे पाणी परिट नदीत मिसळल्याने नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली. चिंचपूर रोड, कोरडगाव रोड स्मशानभूमी, जानकाबाई अमरधाम, संगमेश्वर मळा, खोलेश्वर, तपणेश्वर, पोळा मारुती, दुले-चांदगाव शिवार परिसरात नदीकाठची घरे पाण्याखाली गेली.
नगरपालिका प्रशासनाने तत्काळ नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत घरासह पाळीव जनावरे सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना केल्या. तनपुरवाडी, वाळुंज, हंडाळवाडी, दुले चांदगाव, खेर्डे, सांगवी, सुसरे सोमठाणे, पगारी पिंपळगाव येथील नागरिकही तलाव फुटून पूर येणार या अफवा पसरल्याने भयभीत झाले होते.
पाथर्डी शहरातील या पूरस्थितीमुळे नागरिकांच्या मालमत्तेचे, व्यवसायाचे आणि दैनंदिन जीवनाचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाकडून मदत व पुनर्वसनाची मागणी होत आहे. प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, पोलिस निरीक्षक विलास पुजारी, मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्यासह सर्व प्रशासकीय यंत्रणा या बचाव कार्यासाठी मदत करत होती.
कोणत्या कॉम्प्लेक्समध्ये नुकसान?
मुंडे कॉम्प्लेक्स - गर्भगिरी मॉल्समध्ये पाणी शिरून मोठे आर्थिक नुकसान, गर्जे कॉम्प्लेक्स - तळघरातील दुकानांच्या माल व साहित्याचे नुकसान, भानुप्रयाग कॉम्प्लेक्स (कोरडगाव चौक) - दुकाने पाण्याखाली, मित्रधन कॉम्प्लेक्स (माणिकदौंडी रोड) तळमजल्यातील दुकानांना हानी, देशमुख कॉम्प्लेक्स (नगर रोड) - नागेबाबा पतसंस्थेजवळील गाळ्यात पाणी भरले.
कोणती मंदिरे पाण्याखाली?
हनुमान बाग येथील हनुमान मंदिर, चिंचपूर रोडवरील शनी मंदिर पूल, गाडगे आमराई येथील देवीचे मंदिर.
कोणते रस्ते जलमय?
शेवगाव रोड - बसस्थानक परिसर, नगर रोड - कॉम्प्लेक्स व दुकानात पाणी, माणिकदौंडी रोड - व्यापारी वस्ती जलमय. चिंचपूर रोड - गुगळे पेट्रोलपंप व हनुमान बाग नदीकाठ पाण्याखाली.
नदीकाठची धोकादायक स्थिती
शिरसाटवाडी पाझर तलाव व बिबे आंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरले. वरच्या छोट्या बंधाऱ्यांच्या फुटण्यामुळे परिट नदी धोक्याच्या पातळीवर चिंचपूर रोड, स्मशानभूमी, संगमेश्वर मळा, तपणेश्वर, पोळा मारुती परिसरातील घरे पाण्याखाली
शेती, घरे, दुकाने, जनावरे, रस्त्यांचे नुकसान
टाकळी मानूर येथील गणपत बर्डे आणि माणिकदौंडी परिसरातील लांडकवाडी येथील राजू बजरंग साळुंके हे दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेले. करंजी, जवखेडे, हनुमानटाकळी येथील 127 नागरिकांना एनडीआरएफ व अग्निशमन दलाच्या जवानांनी पुरातून बाहेर काढले. याशिवाय कासार पिंपळगाव, मढी, शिरापूर, निवडुंगे, शिरसाटवाडी, माणिकदौंडी, मानेवाडी, मोहटे, कारेगाव, वाळुंज यांसह नदीकाठच्या गावांतील नागरिकांना स्थानिक तरुणांनी जेसीबी, मानवी साखळी व दोरीच्या साह्याने जीव धोक्यात घालून वाचवले.
अतिवृष्टीमुळे तालुक्यातील मोठ्या प्रमाणात रस्ते वाहून गेले. कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग, बारामती-संभाजीनगर राज्य महामार्ग व पाथर्डी-बीड राज्य महामार्गावरील पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. पहाटेपासून सकाळी दहापर्यंत सर्व वाहतूक ठप्प राहिली. अजूनही बारामती-संभाजीनगर महामार्ग बंद आहे.
पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. बाजरी, कापूस, तूर, मूग यांसह अनेक पिके वाहून गेली. चिंचपूर इजदे येथील दुकाने व घरे पाण्याने वाहून गेली, उद्धव खेडकर यांच्या दुकानात लाखो रुपयांचे खत व इतर मालाचे नुकसान झाले. मानेवाडी येथील बंधारा फुटल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले. महादेव मरकड यांच्या ड्रॅगन फ्रुट बागेचे पूर्णतः नुकसान झाले. तिनखडी, चिंचपूर इजदे, जवखेडे खालसा, तिसगाव येथील स्मशानभूमी वाहून गेल्या. अनेक जनावरे, वाहने, वीज खांब व ट्रान्सफॉर्मर पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.
बारामती ते छत्रपती संभाजीनगर या राज्य महामार्गावरील शिरसाटवाडी येथील पुल निकामी होऊन वाहतुकीला त्याचा फटका बसला आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात सुरू होता. त्यानंतर हळूहळू जन जीवन पूर्वपदावर येऊ लागले. मात्र सायंकाळपर्यंत पुरात अडकलेल्या लोकांना काढण्याचे काम सुरू होते.
काही ठिकाणी लोकांना स्थलांतरित करून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. वीजपुरवठा बंद झाल्याने अनेक गावात अंधार पसरला आहे. वाहतूक ठप्प, शेतीचे नुकसान, घरे व दुकाने पाण्याखाली जाणे, स्मशानभूमी वाहून जाणे, जनावरे व वाहने पुरात वाहून जाणे या सगळ्या घटनांनी पाथर्डी तालुका हादरून गेला आहे.
आपत्ती निवारणासाठी प्रशासन, पोलिस, महसूल यंत्रणा, एनडीआरएफ तसेच लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. आमदार मोनिका राजळे, आमदार शिवाजी कर्डिले व आमदार शिवाजीराव गर्जे यांनी तातडीने मदतकार्य गतीने करण्याच्या सूचना दिल्या. खासदार निलेश लंके यांनीही पूर परिस्थितीबाबत प्रशासनाला सूचना केल्या. केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ॲड. प्रताप ढाकणे यांनी नुकसानग्रस्त गावांना भेट देऊन विशेष पंचनामे करण्याची मागणी केली.
एवढा पाऊस कधी पाहिला नाही
या ढगफुटीने केवळ दोन निष्पाप जीव घेतले नाहीत, तर शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि नागरिकांच्या आयुष्यभराच्या मेहनतीचे मोठे नुकसान करून ठेवले आहे. गेली पन्नास वर्षापासून एवढा पाऊस कधी पाहिला नाही असे अनेक नागरिकांनी सांगितले. प्रांत अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, लोका कृषी अधिकारी महादेव लोंढे यांच्यासह विविध विभागाचे प्रतिनिधी यांच्याकडून मदत कार्य सुरू होते.