

नगर: राहुरी येथे पुतळ्याची झालेली विटंबना अतिशय निंदनीय असून या घटनेचा तीव्र शब्दात आपण निषेध करीत आहोत. या घटनेतील आरोपींना शोधून काढण्याच्या सूचना पोलिस प्रशासनास देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या भावना तीव्र होणे स्वाभाविक असल्याचे स्पष्ट करत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून सर्व माहिती आपण जाणून घेतली. स्थानिक पातळीवर नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन आ. शिवाजी कर्डिले यांनी तातडीने येऊन सर्व परीस्थिती समाजावून घेतली आहे. या घटनेतील आरोपीनी केलेले कृत्य सर्व समाजमनाच्या भावना दुखावणारे असल्याने त्यांची गय केली जाणार नाही.
पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. आरोपींच्या शोधासाठी तपास पथक वाढविण्याच्या सूचनाही देतानाच जिल्ह्यात पुन्हा असे कृत्य करण्याची कोणी हिंमत करणार नाही अशी कठोर कारवाई करण्याबाबत पोलिसांना सांगण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
हिंदुत्ववादी संघटना तसेच सकल हिंदू समाजाने रस्त्यावर येऊन व्यक्त केलेल्या भावनांची गंभीर दखल सरकारने घेतली असून नागरीकांनी शांतता बाळगावी असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.