

Finally, a report was submitted to the district surgeon in the case of the death of a pregnant woman
संगमनेर : पुढारी वृत्तसेवा
अकोले तालुक्यातील विवाहितेचा बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील सहा डॉक्टरांनी कारणे दाखवा नोटीसींचा लेखी खुलासा केला आहे. याबाबत सर्व माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठविण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी आता ते निर्णय घेणार आहेत, अशी माहिती घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र जहऱ्हाड यांनी दिली.
अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथील महिलेचा गर्भपातामुळे मृत्यू झाला होता. तिला त्रास होऊ लागल्याने संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती खालावल्याने तिला पुढील उपचारांसाठी तत्काळ लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चांगलीच चर्चा झडल्याने लेखी तक्रारी गेल्यानंतर अखेर चौकशी सुरू झाली होती.
महिलेचा गर्भपातामुळे मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सकांनी संगमनेरातील ५, जोर्वे येथील १ अशा एकूण ६ डॉक्टरांना घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांमार्फत कारणे दाखवा नोटीस बजावली होती. याप्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ होती. या आता पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सहा डॉक्टरांनी संगमनेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जन्हाड यांच्याकडे स्वतःची बाजू मांडली आहे. यासर्व डॉक्टरांचा लेखी खुलासा ग्रामीण रुग्णालयाने जिल्हा शल्य चिकित्सांकाकडे पाठविला आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातून फारसे काही निष्पन्न होणार नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून वैद्यकीय क्षेत्रात सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळणार आहे.