

जामखेड : मागील भांडणाच्या कारणावरून जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटील यांना दहाजणांनी लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी तीन महिलांसह दहाजणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा खर्डा पोलिस ठाण्याता दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी गहिनीनाथ मुकुंद खरात, श्रीकांत भिमराव लोखंडे, बारक्या नवनाथ खरात, मुकुंद खरात (पूर्ण नाव माहीत नाही), संभाजी केरू खरात, ओकांर परमेश्वर इंगळे, संजीवनी संभाजी खरात, पूजा गहिनीनाथ खरात, सविता बाळासाहेब खरात व एक अनोळखी व्यक्ती (सर्व शुक्रवार पेठ, खर्डा ता. जामखेड) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः हल्ल्यात जखमी झालेले वैजीनाथ पाटील हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व खर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंच संजीवनी पाटील यांचे पती आहेत. आरोपी श्रीकांत लोखंडे यांची पत्नी खर्डा ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यामुळे श्रीकांत लोखंडे हा ग्रामपंचायतीच्या कामकाजावरून वाद घालत असल्याने त्याच्याशी पाटील यांच्या मुलाचे भांडण झाले होते.
वैजनाथ पाटील 4 एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजता मित्रां सोबत खर्डा गावातील एका खानावळीत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी श्रीकांत लोखंडे याने हॉटेलसमोरुन एक दोन वेळा चकरा मारल्या. यानंतर रात्री अकरा वाजता आरोपी नाचाक्स, लोखंडी पाईप व लाकडी दांडके घेऊन आले. पाटील यांना जीवे मारा, अशी धमकी देत लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात सुरवात केली. यात पाटील गंभीर जखमी झाले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय झंजाड करीत आहेत.