गोरक्ष शेजूळ
सध्या विधानसभेचे फटाके जोरात फुटू लागले आहेत. साहजिकच विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचाही बार उडण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आपली विधानसभा काढून घेण्यासाठी अनेक उमेदवारांनी आपल्या मतदार संघातील नगरपालिकेच्या प्रभागांसह झेडपी, पंचायत समितीच्या गट-गणातील इच्छूकांना ‘शब्द’ देऊन आताच बोहल्यावर चढवल्याचे बोलले जाते. तर दुसरीकडे ही निवडणूक आणि त्यातील रसद जरी आपल्या नेत्यांची असली तरी यातून आपली ‘स्थानिक’ तयारी करून घेण्यासाठी इच्छूकांनीही हीच संधी शोधल्याचे चित्र आहे.
गेल्या अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर प्रशासक आहेत. त्यामुळे अडीच वर्षांपासून प्रभागासह गट आणि गणातील माजी सदस्य भूमिगत झाल्याचे पहायला मिळत होते. निवडणुका नसल्याने लोकसभा निवडणुकीतही सत्ताधारी आणि विरोधी गटांकडे ‘ते’ माजी सदस्य फारसे सक्रिय दिसले नाही. मात्र आता विधानसभेनंतर सरकार कोणाचेही येवो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणारचं, असे संकेत आहेत.
सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी हीच संधी लक्षात घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना शब्द दिले आहेत. काहींना पंचायत समितीच्या सदस्यांपासून सभापती, तर काहींना थेट मिनी मंत्रालयात पोहचविण्याचेही वचन देण्यात आल्याची चर्चा आहे. याशिवाय शहरात जो चांगला काम करेल, तोच नगराध्यक्ष पदाचा चेहरा अशीही ऑफर दिल्याचे कानावर येत आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी इच्छूक असलेले कार्यकर्ते मैदानात उतरताना दिसत आहे. दिवाळीनंतर कार्यकर्त्यांच्या उठबशा वाढणार आहेत. दुसरीकडे एका गावात आपले दोन गट असतील तर मोठ्या खुबीने दोघांनाही तसे शब्द दिले आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात जि.प. आणि पं. समितीच्या केलेल्या नवीन रचनेनुसार 85 गट आणि 170 गण तयार करण्यात आलेले आहेत. मात्र सरकार बदलल्यानंतर या आराखड्याला ब्रेक लावण्यात आला. त्यामुळे येणारी निवडणूक ही किती गटात होणार, याचा निर्णय देखील विधानसभेच्या निकालानंतरच सत्तेत येणार्या सरकारवरच अवलंबून आहे. त्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते जुन्या गटानुसार तर मविआचे कार्यकर्ते अंदाज बांधून नवीन गट रचनेनुसार आपले ‘स्थानिक‘चे राजकीय फासे फेकताना दिसत आहेत.
मुदत संपलेल्या मनपासह नगरपालिकांच्या प्रभागातील इच्छूक आता उमेदवार असलेल्या आपल्या नेत्यांच्या चमूत दाखल झाले आहेत. त्यांनी प्रचारासाठी कार्यकर्त्यांची फौजही प्रभागात उतरवली आहे. त्यासाठी दिवाळी फराळाचे निमंत्रण असेल किंवा इतर ‘नियोजन’ हाती घेऊन इच्छूक कार्यकर्ते गोळाबेरीज करण्याच्या तयारीत दिसत आहेत.