लाल मातीत ऑलिम्पिकवीर घडविण्याचे प्रयत्न : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानात मातीपूजन
maharashtra kesari
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा Pudhari
Published on
Updated on

1952 मध्ये खाशाबा जाधव यांनी ऑलम्पिक पद मिळविले. मात्र, त्यानंतर महाराष्ट्राला कुस्तीत ऑलम्पिक पद मिळवून देणार वीर घडला नाही अथवा घडविण्यात आपण कमी पडलो. त्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून लाल मातीतील कुस्तीला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. लाल मातीतून ऑलम्पिक वीर घडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कुस्तीला राजाश्रय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्र केसरी मल्लांना थेट नोकरीत सामावून घेतले तर, पैलवानांच्या मानधनात वाढ केली, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.

अहिल्यानगर येथील वाडिया पार्कमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मैदानातील मातीपूजन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार शिवाजी कर्डिले, राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा माजी खासदार पै. रामदास तडस, अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा आमदार संग्राम जगताप, माजी आ. अरुण जगताप, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, उपाध्यक्ष गुलाब बर्डे, सरचिटणीस हिंद केसरी पै. योगेश दोडके, अशोक शिर्के, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, संतोष भुजबळ, कुमारसिंह वाकळे, संपत बारस्कर, अविनाश घुले, पैलवान अनिल गुंजाळ, रवींद्र कवडे, युवराज करंजुले, गणेश कवडे, शिवाजी चव्हाण, प्रवीण घुले, अनिल शिंदे, प्रकाश भागानगरे आदी उपस्थित होते.

मंत्री मोहोळ म्हणाले, अहिल्यानगर शहराला कुस्तीची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून चांगले मल्ल निर्माण करून देशाचे प्रतिनिधित्व करतील, खेळाडूंचे मनोधर्य व लोकप्रियता वाढविण्यासाठी राजश्रय मिळून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काम केले. अहिल्यानगरमध्ये होणारी स्पर्धा कुस्ती क्षेत्राला नवी ऊर्जा देण्यात यशस्वी ठरेल. पैलवान हुशार असतो तो एक मिनिटांत 50 डाव टाकत असतो त्याच्या इतके हुशार कोणीच नसते. आता आम्ही सर्वजण कुस्तीला बदनाम होऊन देणार नाही. महाराष्ट्र सरकारने मातीतल्या खेळाला भरीव अर्थसहाय दिले असून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी एक कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला आहे. तसेच, महाराष्ट्र केसरी व हिंद केसरींच्या पुरस्कार रकमेतही वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. कुस्ती वाढली पाहिजे, कुस्तीला राजश्रय मिळाला पाहिजे. कुस्ती स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन झाल्यास कुस्तीगीरांना प्रेरणा मिळते.

आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले की, कुस्तीमुळे शरीर निरोगी व मन शुद्ध रहाते, जीवनात नवी ऊर्जा मिळते. लाल मातीत श्रम करताना पैलवानांनी चुकीच्या गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. कुस्ती क्षेत्र आता मागे पडत चालले असून क्रिकेटला महत्त्व प्राप्त झाले आहे. जिममध्ये जावून इंजेक्शन घेण्यापेक्षा तरुणांनी लाल मातीत व्यायाम करावा. नगर दक्षिण जिल्ह्यावर नेहमीच अन्याय होतो. प्रत्येक सभा, शिबिर शिर्डी येथे होते. त्यामुळे दक्षिणेत प्रतिशिर्डी निर्माण करावी.

माजी खा. रामदास तडस म्हणाले, महाराष्ट्रातील कुस्तीगीरांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले यश संपादन केले आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर संघातर्फे कुस्तीगीरांना चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत. त्यांनी ऑलिंपिक, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत चांगले यश मिळावे यासाठी प्रयत्न होत आहेत.

आमदार संग्राम जगताप म्हणाले, महाराष्ट्र केसरी स्पर्धेला वेगळे महत्त्व आहे. 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार असून राज्यातील मल्ल स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेतून देशभरातील मल्लांना प्रेरणा मिळेल. अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची गौरवशाली परंपरा आहे, हे वैभव आणखी वाढविण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरणार आहे.

जिल्हा क्रीडा संकुलासाठी 51 कोटींचा आरखडा तयार केला आहे. त्यातील 15 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. क्रीडा संकुलात अत्याधुनिक तलीम असणार आहेत. त्यात मॅट व जीमही असणार आहे. येणार्‍या काळात जिल्ह्याचे विभाजन होईलच त्यामुळे अहिल्यानगर शहराजवळ विमानतळ आवश्यक आहे. त्यासाठी मंत्री मोहोळ यांनी प्रयत्न करावे. प्रास्ताविक संतोष भुजबळ यांनी केले.

आ. जगताप स्पर्धा यशस्वी करतील

लाल मातीशी नाते असणारा माणूस ही स्पर्धा यशस्वी करू शकतो म्हणून आमदार संग्राम जगताप व त्यांचे सहकारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडतील. अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची वैभवशाली परंपरा असून छबुराव रानबोकेपासून गुलाब बर्डेपर्यंत चांगले पैलवान निर्माण झाले आहे. त्यामुळे इथे होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा निश्चितपणे यशस्वी होईल, असा आशावाद मंत्री मोहोळ यांनी व्यक्त केला.

आ. कर्डिलेंच्या शब्दफेकीवर हशा

राजकारणात कोतीही गोष्ट टिकून नसते. मी ही निवडणुकीत म्हणत होतो, की ही शेवटची निवडणूक आहे. मात्र, प्रत्यक्षात तसं काही नसतं, असे आमदार शिवाजी कर्डिले म्हणाल्यानंतर एकच हशा पिकला.

पहिलवानकी कामाला आली

खरं मी दहावी अकरावी शिकलेला माणूस आहे. पण राजकारणात मला पहिलवानकी कामाला आली. नाही तर साखरसम्राटांपुढे आपला निभाव लागणे कठीण होते. पण, लाल मातीतील पहिलवान असल्याने डावपेच टाकता आले, असेही आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news