

अकोले : अकोले रेशन वितरण व्यवस्थेमध्ये दिवसेंदिवस विविध अडचणी येत असतानाच आता अकोले तालुक्यातील ई-पॉस मशीनमध्ये नवीन तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. जी नावे मराठीमध्ये येतात, त्यांना धान्य वाटप करता येत नाही, त्यांची ई-केवायसीसुद्धा करता येत नसल्याने अनेक लाभार्थीना चालू महिन्याचे रेशन अद्यापही मिळालेले नाही. नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. (Latest Ahilyanagar News)
अकोले तालुक्यात अंत्योदय रेशनकार्ड असणार्या कुटुंबांची संख्या 6 हजार 187, तर प्राधान्य रेशनकार्ड असणार्या कुटुंबाची संख्या 36 हजार 36 इतकी आहे.तसेच ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचण केवळ अकोले तालुक्यात नाही; तर बहुतांश जिल्ह्यात झाली असल्याची माहिती पुरवठा कार्यालयाकडून देण्यात आली. मराठीत नावे दिसणार्यांना धान्य मिळत नाही आणि इंग्रजीत नावे सेव्ह असलेल्यांना मिळते, मग आम्हाला का नाही या प्रश्नातून अधिक गोंधळ निर्माण झाला आहे. रेशनसाठीच्या ई-पॉस मशीनला मराठीचे बावडे आहे काय ? असा सवालसुद्धा करण्यात येत आहे.
रेशन वितरण सुरू होते, त्यावेळी दुकानावर मोठी गर्दी झाल्याचे पाहावयास मिळते; मात्र लाभार्थी धान्य घ्यायला जातात, तेव्हा इंग्रजीमध्ये नाव येणार्या कुटुंबांना रेशन मिळते. ई-पॉस मशीनमध्ये जी नावे मराठीत येतात, त्यांना रेशन नाकारले जाते. या तांत्रिक अडचणीविषयी लोकांमध्ये माहिती नसल्याने तालुक्यात गोंधळ उडाला आहे .तर केवळ इंग्रजी नावांचा स्वीकार केल्यानेच अशा तांत्रिक अडचणींमुळे नागरिक रेशनपासून वंचित राहत आहेत.
इंग्रजी नावा ऐवजी मराठीतून रेशन धारकांचे नाव ई पॉसवर येत असल्याने पावती ई पॉस मशीनमधून निघत नाही. त्यामुळे धान्य लाभार्थ्यांना देत नव्हते. परंतु आता बहुतांश रेशन दुकानात सदरची अडचण दूर होत असल्याने धान्य मिळण्यात कोणत्याही प्रकारची अडचण नाही.
-संदीप निळे, पुरवठा निरीक्षक अधिकारी,अकोले.
स्वस्त धान्य दुकानाच्या ई पॉज मशीनवर मराठीमध्ये फीडिंग झालेल्या शिधापत्रिका धारकांचे बिलच होत नसल्यामुळे गोरगरिबांना धान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली. या बाबत तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सप्टेंबर महिन्यात स्वस्त धान्य दुकानातून उशिरा धान्य वाटप सुरू झालेले आहे. त्यातच इ-पॉज मशीनवर मराठी भाषेत फीडिंग केलेल्या ऑनलाईन रेशन कार्डचे धान्याचे बिलच निघत नसल्यामुळे अनेक ठिकाणी वितरण व्यवस्थेचा गोंधळ उडाला आहे. कार्डधारक आणि दुकानदार यांच्यामध्ये विनाकारण वादावादी होत आहेत. इंग्रजी डाटा फीडींग असलेल्या कार्डधारकाचे बिल निघत आहे. त्यामुळे दुकानदार त्यांना धान्य देतात. परंतु मराठी भाषेत कार्डधारकांंची नावे भरलेली असलेल्या लाभधारकांचे बिलच निघत नसल्यामुळे त्यांना धान्य देता येत नाही. त्यामुळे अनेक कार्डधारक धान्यापासून वंचित राहू शकतात.
याबाबत विशेष माहिती घेतली असता, असे समजले की महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यात ओयासिस कंपनीचे ई पॉज मशीन आहे. त्याच मशीनला ही समस्या निर्माण झालेली आहे, तरी संबंधित अधिकार्यांनी तातडीने त्यात दुरुस्ती करावी, अशी कार्डधारकांची मागणी आहे.
याबाबत ऑल महाराष्ट्र फेर प्राईस शॉप किपर फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे यांचे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, याबाबत मंत्रालयातील संगणक कक्ष अधिकारी प्रज्ञा पटेल यांच्याशी संपर्क केला असून दोन दिवसात ही समस्या सुटेल. नगर जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातील धान्य वाटपात आलेले अडचण तातडीने दूर करावे, अशी मागणी दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष सतीश हिरडे व उत्तर नगर जिल्हाध्यक्ष काशिनाथ आरगडे यांनी केली आहे.