

राहुरी: डॉ.बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. सभासदांच्या अपूर्ण शेअर्स पूर्ण करणे, थकबाकी भरणे, याची अंतिम मुदत कालची 12 मार्च होती. त्यामुळे 1700 सभासदांवर अपात्रतेची टांगती तलवार असतानाच, काल शेवटच्या दिवशी भरणा करण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर एकही कर्मचारी नसल्याने सभासदांनी मोठा संताप व्यक्त केला.
विरोधकांनी हा सत्ताधार्यांचा राजकीय डाव असल्याचा आरोप केला, नव्हे नव्हे तर हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत नेल्याने कारखान्याचे राजकारण चांगलेच पेटल्याचे दिसले. विशेष म्हणजे या प्रक्रियेत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे सत्ताधार्यांविरोधात प्रथमच उघडपणे मैदानात उतरल्याने ही निवडणुकही आता चुरशीची व तितक्याच प्रतिष्ठेची होणार हे स्पष्ट झाले आहे.
डॉ. तनपुरे कारखान्यासाठी कृती समिती सक्रिय झाली आहे. त्याचबरोबरच तनपुरे गट आणि अजित पवारांचा राष्ट्रवादीचा गटातही हालचाली वाढताना दिसत आहे. दुसरीकडे सत्ताधार्यांनी ‘ब’ वर्गचे ठराव जमा करून एक पाऊले यापुर्वीच पुढे टाकले आहे. त्यामुळे कारखाना निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही.
मात्र कारखाना बचाव कृती समितीसह इतर 1700 सभासदांचे शेअर्स अपूर्ण आहेत, काहींकडे कारखान्याची थकबाकी आहे. त्यामुळे प्रारुप यादीत त्यांची नावे नाहीत, मात्र अंतिम यादीत नावे येण्यासाठी शेअर्स, थकबाकी भरणे गरजेचे आहे.त्यासाठी इच्छूक सभासद हे कारखाना कार्यस्थळावर हेलपाटे मारत आहेत.
मात्र मुदतीची शेवटची तारीख आली तरीही पैसे कोणाकडे द्यायचे, हा प्रश्न पडल्याने सभासद संतप्त झाले. मंगळवारी सकाळी माजी मंत्री तनपुरे यांनी डॉ. तनपुरे कारखान्याचे केंद्रीय कार्यालय गाठले. यावेळी कार्यालय बंद दिसताच त्यांनी सत्ताधारी तसेच प्रशासनावर जोरदार आरोप केले. कारखाना प्रशासन तथा निवडणूक अधिकारी हे सत्ताधारी यांचे ऐकून काम करत असून पुन्हा त्यांचीच सत्ता कशी येईल यासाठी दुरुपयोग करत आहे.
तसेच त्यांच्याच मर्जीतल्या सभासदांचे अपूर्ण शेअर्स पूर्ण करून घेत असून अन्य सभासदांना यापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे. कुठलाही अधिकारी उपलब्ध नाही.सभासदांना चकरा माराव्या लागत आहे ही त्यांची खेळी असल्याची टीका तनपुरे यांनी केली आहे. प्रशासनातील अशा अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी तनपुरे यांनी पोलिसात केली आहे. दरम्यान, काल शेवटच्या दिवशी बुधवारी कर्मचारी नेमणूक केल्याने अनेक सभासदांनी आपले शेअर्स पूर्ण करून मतदार यादीत नाव सामाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा केल्याचे दिसले.
याप्रसंगी कारखाना कृती समितीचे अमृत धुमाळ, अरुण कडू, हर्ष तनपुरे, सुखदेव मुसमाडे, प्रकाश भुजाडी, नंदकुमार तनपुरे, अशोक खुरुद, प्रमोद कदम, विलास गागरे, कृष्णा मुसमाडे, संजय पोटे ,अरुण ढुस सुरेश धुमाळ, अनिल इंगळे, हरिभाऊ खामकर, अरुण डोंगरे, रमेश डोंगरे यांसह सभासद बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अरुण तनपुरेंच्या नेतृत्वात तयारी सुरू!
सत्ताधारी अॅड. सुभाष पाटील, नामदेव ढोकणे, सुरशिंग पवार यांच्या गटाने सेवा संस्थांमधील ब वर्ग मतदार संघात आपले जास्तीत जास्त ठराव सादर केले आहेत. तर दुसरीकडे तनपुरे गटाकडून बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शनात निवडणुकीची गुप्त रणनिती सुरू असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत व त्यांच्या सहकार्यांनीही माजी मंत्री तनपुरे व सभापती अरुण तनपुरे यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे समजते. कृती समितीही या गटासोबत आल्यास सत्ताधार्यांविरोधात राहुरी तालुका एकटवलेला पहायला मिळू शकतो, अशीही चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांची भूमिका काय?
कारखाना बचाव कृती समितीचे अमृत धुमाळ, अरुण कडू व त्यांच्या सहकार्यांनी तनपुरे कारखान्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातल्याचे बोलले जात आहे. त्यातच त्यांच्या गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व सभापती अरुण तनपुरे यांच्याशी संवाद साधत सहकार्याची भावना व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आजोळ असलेल्या राहुरी तालुक्यातील कामधेनू वाचविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.